स्थैर्य,मुंबई, दि.१६: पूजा चव्हाण आत्महत्येनंतर एका मंत्र्याचं नाव या प्रकरणी समोर आलं, त्यानंतर यावरून राजकारण तापलं आहे. शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यासोबत असलेल्या कथित संबंधामुळे पूजा चव्हाणने आत्महत्या केली असा आरोप भाजपाने केला होता, यात आरोपानंतर संजय राठोड यांचं मंत्रिपद अडचणीत सापडलं होतं, राठोड यांची हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपाने केली होती. अखेर या प्रकरणात संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती आता समोर आली आहे. याच दरम्यान भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राठोड यांच्यावर निशाणा साधताना ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
“राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही. त्यांना राजीनामा द्यायलाच लागणार होता” असं म्हणत निलेश राणेंनी हल्लाबोल केला आहे. तसेच संजय राठोड यांच्यावर गुन्हाही दाखल व्हावा अशी मागणीही केली. वनमंत्र्यांनी राजीनामा दिला मात्र तो राजीनामा उद्धव ठाकरे स्वीकारणार का? हे ही पाहावं लागेल असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे. “हत्या की आत्महत्या याची चौकशी केली पाहिजे. ठाकरे सरकारने आतापर्यंत सगळ्यांना वाचवण्याचं काम केलंय. परंतु आता नेत्यांना वाचवण्याचं काम थांबवायला हवं. नेत्यांच्या कृत्यांची शिक्षा त्यांना व्हायलाच हवी” असं निलेश राणे म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.
“महाराष्ट्र यांच्या बापाचा नाही, एक ना एक दिवस यांचं सरकार जाणार; हे सर्वांनी लक्षात ठेवावं”
निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड अडकले म्हणूनच त्यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. तसेच SSR आणि दिशा सालियन प्रकरणात देखील आदित्य ठाकरेचं नाव घेण्यात आलं होतं. मात्र, मुख्यमंत्री यांनी स्वतःच्या मुलाला वाचवलं” असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. तसेच भाजपाच्या नेत्यांना या सर्व प्रकरणात धमक्या आल्या. मात्र मला त्यांना सांगायचंय महाराष्ट्र यांच्या बापाचा नाही, एक ना एक दिवस यांचं सरकार महाराष्ट्रामधून जाणार आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवावं, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
संजय राठोड यांचा राजीनामा का घेतला?
पक्ष किंवा सरकार अडचणीत येत असेल तर राजीनामा घेऊन ठेवावा असा एक मतप्रवाह शिवसेनेत पाहायला मिळत होता. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्येशी निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हा राजीनामा घेतला आहे, त्याचसोबत उद्धव ठाकरेंच्या या कृतीतून राष्ट्रवादीला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. यापूर्वी राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यावर आरोप झाले होते, मंत्र्याच्या बंगल्यात नेऊन तरूणाला मारहाण करणे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांच्यावर लागला होता, तर धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता, त्यानंतर दोन पत्नी, मुलं हे सगळं प्रकरण समोर आलं, या दोन्ही प्रकरणात शरद पवारांनी राष्ट्रवादी मंत्र्यांची पाठराखण केली होती.
“मुख्यमंत्री निर्णय घेतील”; संजय राठोड राजीनाम्यावर शिवसेना खा. संजय राऊत म्हणाले…
आत्महत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी यासाठी हा राजीनामा घेतल्याचं सांगण्यात येत आहे. आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप मला काही माहिती नाही, परंतु संजय राठोड हे प्रकरण सरकारशी संबंधित आहे, सरकारचे प्रमुख लोकं त्या विषयाशी संबधात निर्णय घेतील, संजय राठोड हे शिवसेनेचे आमदार, मंत्री आहेत, अनेक वर्षापासून ते शिवसेनेचा चेहरा आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत, शिवसेनेत दोन गट वैगेरे काही नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.