गेल्या काही वर्षांपासून राज्यासह देशातील राजकीय वारे बर्याच अंशी उलट – सुलट वाहत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वत्र प्रचाराची धामधूम सुरू झाली असून प्रचाराचे नारळ फुटण्यापासून जाहीर सभांपर्यंतचे नियोजन जोमात सुरू आहे. हे जरी असले तरी जुन्या कार्यकर्त्यांच्या तुलनेत सध्याच्या नव्या कार्यकर्त्यांचा ‘ट्रेंड’ बदललेला असल्याचे प्रचाराच्या नियोजनात प्रकर्षाने जाणवत असल्याचा सूर फलटण तालुक्यातील ज्येष्ठ नेते मंडळींकडून ऐकायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काही जुन्या-जाणत्या नेत्यांशी अनौपचारिक गप्पा रंगल्या असता त्यांच्याकडून पूर्वीच्या काळातील प्रचार यंत्रणा आणि आत्ताच्या काळातील प्रचार यंत्रणा यामधील बदललेला कार्यकर्ता ही बाब प्रामुख्याने अधोरेखित करण्यात आली.
‘ज्याला – त्याला वाटतंय मीच नेता’
कार्यकर्त्यांच्या बदललेल्या ‘ट्रेंड’बाबत बोलताना अनेकजण सांगतात की, ‘आधीच्या काळात नेता सांगायचा आणि कार्यकर्ता ऐकायचा. एखाद्या सभेमध्ये अथवा बैठकीमध्ये केंद्रस्थानी केवळ नेता असायचा. पण, आता तशी परिस्थिती नाही. प्रत्येकाला वाटतं नेत्यापेक्षा पण आपल्याला राजकारण जास्त समजतं. सभा, कार्यक्रम, बैठका यामध्ये नेत्याच्या मांडीला मांडी लावून बसण्याची धडपड कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांची असते. राजकीय सभांची व्यासपीठे त्यामुळेच खचाखच भरलेली आपल्याला प्रकर्षाने दिसून येतात.
‘गाडीत बसण्यावरून मानापमान’
पूर्वीच्या काळी प्रचारासाठी, सभांसाठी एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाताना ट्रक, टेम्पो अशा वाहनांचा वापर करता यायचा. शिवाय कार्यकर्तेही जशी व्यवस्था असेल तशी ती स्वीकारायचे. पण, आता वातानूकुलित गाड्यांची मागणी होते. शिवाय गाडीत पुढे कुणी बसायचे आणि मागे कुणी बसायचे, यावरून बर्याचदा मानापमानाची भावना कार्यकर्त्यांच्या मनात येते. या मानापमानाच्या भानगडीत गाडीतील मागचे आडवे सीट आता बर्याचदा मोकळेच राहत असल्याचे, गंमतीदार निरीक्षण नेते मंडळींकडून नोंदवण्यात येत आहे.
‘सभांना आलिशान मंडप आणि खुर्च्या’
‘पूर्वीच्या सभा खुल्या आभाळाखाली सतरंजी हांथरून त्यावर व्हायच्या. पण, आता जाहीर सभांचा डामडौल वाढला आहे. भव्य व्यासपीठ, मंडप आणि लाखोंच्या संख्येने खुर्च्या मांडल्याशिवाय सभेची उंची वरच्या पातळीवर जात नसल्याचे दिसून येत आहे. आता जर का गावात सभा घेतली आणि पूर्वीप्रमाणे ऐकणार्यांसाठी सतरंजी हंथरली तर त्या सतरंजीवर बसून सभा ऐकण्याची मानसिकता कार्यकर्त्यांमध्ये राहिलेली नाही. कार्यकर्ते सभास्थळाच्या आसपास घुटमळताना दिसतील. पण, ‘खाली बसून आम्ही सभा कशी ऐकायची?’ या अविर्भावात सभेतील सतरंजी ओस पडेल आणि ती सभा सपशेल फेल होईल’, असेही नेते मंडळींकडून बोलण्यात येत आहे.
प्रत्यक्ष गाठीभेटीच प्रभावी
‘कार्यकर्त्यांचा बदलता ट्रेंड, प्रचार यंत्रणा राबवताना येणारा वाढता खर्च, प्रत्येकाची वाढती महत्त्वाकांक्षा अशा परिस्थितीत जाहीर सभा, रॅली यापेक्षा प्रत्यक्ष गाठीभेटी हेच प्रचाराचे इथून पुढे प्रभावी माध्यम ठरेल. पूर्वीचा कार्यकर्ता ऐकणारा होता; आत्ताचा कार्यकर्ता ऐकणारा तर आहेच पण तो बोलणाराही आहे, हे लक्षात घेता प्रत्यक्ष भेटीतून होणारी विचारांची, प्रश्नांची आणि भविष्यातील वाटचालीची देवाण – घेवाण कार्यकर्ते आणि नेते या दोहोंसाठी महत्त्वाची ठरते’, असे सूचक मतही या नेतेमंडळींकडून व्यक्त होत आहे.
– रोहित वाकडे