
दैनिक स्थैर्य | दि. २१ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
मुंजवडी (ता. फलटण) माहेर असलेल्या विवाहितेचा आठफाटा (ता. बारामती, जि. पुणे) येथील सासरी पती चारचाकी गाडी खरेदी करण्यासाठी माहेरहून ३ लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावून शारीरिक व मानसिक जाचहाट तसेच लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करत असल्याची तक्रार सौ. भारती देविदास कांबळे (वय २९, राहणार आठफाटा, तालुका बारामती) व सध्या राहणार मुंजवडी (तालुका फलटण) या विवाहितेने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १४ फेब्रुवारी २००९ पासून दि. २० फेब्रुवारी २०२३ पर्यंत पती देविदास महादेव कांबळे (राहणार आठफाटा, तालुका बारामती) हे आठफाटा येथे सासरी असताना शारीरिक व मानसिक त्रास देऊन ‘तू माहेराहून चारचाकी गाडी घेण्यासाठी तुझ्या आई-वडिलांकडून ३ लाख रूपये घेऊन ये’, असे म्हणून त्रास देत होते. तसेच माझ्या माहेरची परिस्थिती नसल्याने व मी पैसे न दिल्याने त्याने मला उपाशीपोटी ठेवून हाताने, लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. तसेच शिवीगाळ दमदाटी करून माझा शारीरिक व मानसिक छळ केला, अशी तक्रार विवाहिता सौ. भारती देविदास कांबळे (वय २९, राहणार आठफाटा, तालुका बारामती) व सध्या राहणार मुंजवडी (तालुका फलटण) या विवाहितेने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी विवाहितेचा पती देविदास महादेव कांबळे याच्याविरुद्ध मानसिक व शारीरिक जाचहाटाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार सूर्यवंशी करत आहेत.