
स्थैर्य, सातारा, दि.०२: जमीन घेण्यासाठी साडेपाच लाख रुपये माहेरहून आणण्यासाठी पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी मुंबई पोलिस दलात असलेल्या संबंधित पतीसह सासरच्या चौघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू शिवाजी जाधव (मुंबई पोलीस नेमणूक घाटकोपर), कांताबाई शिवाजी जाधव, शिवाजी रामचंद्र जाधव सर्व रा. सिद्धनाथवाडी, दत्तनगर वाई आणि सुरेश शिवाजी जाधव रा. धनकवडी पुणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयितांनी मुंबईत घराला झिपॉझिटसाठी 50 हजार रुपये तसेच वाई येथे जागा घेण्यासाठी 5 लाख रुपये माहेरहून आण अशी मागणी संबंधित विवाहिता विद्या राजू जाधव यांना केली. या कारणासाठी विवाहितेचा वेळोवेळी शारिरीक आणि मानसिक जाचहाट केला. तसेच तिला कोणत्याही कारणावरून मारहाण केली जात असे. याबाबत सातारा येथे भरोसा सेल येथेही या दाम्पत्याचे समुपदेशन झाले आहे. यानंतरही विवाहितेचा छळ सुरू आहे. शिवाय पती राजू जाधव याचे एका मुलीशी प्रेमसंंबंध असल्याबाबत फिर्यादीस माहित होते. पतीच्या मोबाईलमध्ये त्यांचे फोटो मिळून आल्याबाबत विचारणा केल्यानंतरही तिला मारहाण करण्यात येत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला असून तपास हवालदार तावरे करत आहेत.