‘हर घर तिरंगा’ अभियान देशभक्तीची चेतना निर्माण करणार!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२२ । मुंबई । आजादी का अमृतमहोत्सव देशभरात साजरा होत असताना देशभरात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ आणि 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान ‘स्वराज्य महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे, याबाबतचा हा विशेष लेख.

भारताच्या स्वातंत्र्याला 15 ऑगस्ट, 2023 रोजी 75 वर्षे पूर्ण होत असल्याने, केंद्र शासनामार्फत ‘आजादी का अमृत महोत्सव’ हा महत्वाकांक्षी उपक्रम देशभरात साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरु राहणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत अनेक विशेष कार्यक्रम, उपक्रम आयकॉनिक प्रकल्प आणि योजना यांचे नियोजन करण्यात आले आहे. आज भारत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती करीत आहे. गेल्या 75 वर्षांत भारताने केलेला प्रवास जगाने पाहिला आहे. पुढील 25 वर्षांमध्ये आपला देश वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आघाडीवर असणार आहे. ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करताना राबविण्यात येणाऱ्या  ‘हर घर तिरंगा’  या अभियानातून भारतातील प्रत्येक घराघरात देशभक्तीची चेतना निर्माण करणारा ठरणार आहे. 20X13cm, 16X24cm किंवा 6X9cm या आकारातील तिरंगा या अभियानातून घराघरात फडकणार आहे.

आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी केंद्र शासनामार्फत  5 आशय संकल्पना निश्चित करण्यात आलेले आहेत. भारताचा स्वातंत्र्य संग्राम@75,नाविन्यपूर्ण कल्पना@75, नवे संकल्प@75,स्वातंत्र्योत्तर फलनिष्पती@75 आणि अंमलबजावणी@75 असे हे पाच आशय संकल्पना आहेत. याशिवाय रस्ते संग्रहालय, मेरा गाव मेरी धरोहर, डिस्ट्रिक्ट डिजिटल रिपॉझिटरी, फिट इंडिया, बुजुर्गो की बात देश के साथ, अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली, हर घर तिरंगा, स्वराज्य महोत्सव, विद्यार्थी विरासत उपक्रम इत्यादी संकल्पना संपूर्ण देशभरात या वर्षभरात राबविल्या जाणार आहेत.

महाराष्ट्रात हर घर तिरंगा आणि स्वराज्य महोत्सवासाठी सांस्कृतिक कार्य विभाग आणि ग्रामविकास विभाग काम करीत आहे. राज्यातील नागरिकांना हर घर तिरंगा उपक्रमात सामील करुन घेण्यासाठी शासकीय निधीतून ध्वज खरेदी करण्यात येणार आहे. परंतु या उपक्रमात प्रत्येक नागरिकांनी स्वत: राष्ट्रध्वज खरेदी करावा यासाठी प्रेरित करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयात राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे. महाराष्ट्रात शहरी आणि ग्रामीण भागात मिळून जवळपास 2 कोटी 45 लाख कुटुंबे आहेत, त्यापैकी कमीत कमी 2 कोटी घरांवर तिरंगा फडकवण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाचे आहे.

राष्ट्रीयता आणि एकात्मता वृद्धीसाठी हर घर तिरंगा

देशभरात 13 ते 15 ऑगस्ट, 2022 दरम्यान आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमात राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या अभियानाद्वारे देशभरात प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांची आठवण ठेवून आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान या निमित्ताने जपला जाणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या प्रत्येकाची आठवण आपण ठेवणे हे आपल्या प्रत्येकाचे काम असून आजच्या पिढीला त्यांचे महात्म्य, त्यांचे कार्य  आणि विचार समजणे यासाठी राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा हे अभियान महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.  हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग घेण्यात येणार आहे. नागरीकांमध्ये असलेले राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम या अभियानाअंतर्गत करण्यात येणार आहे.

हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट,  2022 दरम्यान देशातील सुमारे 20 कोटी घरांवर  तिरंगा फडकवण्यात येणार असून, संपूर्ण देश भारतमातेच्या सेवेत समर्पित असल्याचा एक संदेश आपण जगाला देणार आहोत. हर घर तिरंगा अभियानाचा प्रचार आणि प्रसार करणे, अभियानासाठी प्रत्येक घरी तिरंगा पोहोचेल आणि 13 ते 15 ऑगस्ट,  2022  दरम्यान घरावर हा तिरंगा फडकेल अशा तीन टप्प्यांमध्ये या अभियानाची पूर्तता होणार आहे.  हर घर तिरंगा अभियान यशस्वी होण्यासाठी राज्यातील प्रत्येक घरासाठी झेंडा मिळेल याची तयारी करत आहे. 11 ते 14  ऑगस्ट  2022 दरम्यान प्रभात फेरीच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्याची लढाई कशी होती याची माहिती प्रभात फेरीच्या माध्यमातून लोकांसमोर नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. गावांमध्ये, तालुक्यांमध्ये 1 तास प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. केंद्र शासनामार्फत सुध्दा वेगवेगळ्या माध्यमातून राज्यांसाठी राष्ट्रध्वज उपलब्ध करण्यात येणार असून पोस्ट ऑफीसमध्ये सुद्धा तिरंगा मिळणार आहे. केंद्र शासनाने सुरु केलेल्या http://harghartiranga.comया संकेतस्थळावर आपले फोटो आणि सेल्फी पाठवून आपण या अभियानात मोठ्या प्रमाणावर सहभागी होता येणार आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. आपल्या शहिदांनी दिलेले बलिदानाची आठवण ठेवत त्यांनी केलेले काम आजच्या पिढीला, तरुण वर्गाला समजावे, माहिती व्हावे आणि आपल्यामध्ये देशभक्तीची प्रेरणा निर्माण व्हावी यासाठीच हर घर तिरंगा हा उपक्रम देशभरात मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. भारताने गेल्या 75 वर्षात केलेली प्रगती याबरोबरच पुढील 25 वर्षांत भारत जगात वेगळा कसा ठरेल याचा संकल्प करण्याचा सुद्धा प्रयत्न यामध्ये होणार आहे. संकल्प से सिद्धी या कार्यक्रमाद्वारे भारताची पुढची 25 वर्षातील वेगवेगळया क्षेत्रातील प्रगती यावर लक्ष देण्यात येणार आहेत. कृषी, उत्पादन, सेवा, सहकार , शिक्षण, पायाभूत सुविधा यामध्ये येणाऱ्या काळात भारताची प्रगती जगभरासाठी प्रेरणादायी ठरेल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

आजादी का अमृत  महोत्सव साजरा करणे हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देताना अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. गेल्या 75 वर्षांत भारताने देशाचे स्वातंत्रय मिळविताना अनेक संकटांचा सामना केला. मात्र आज जगभरात भारताने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. येणाऱ्या काळात ही ओळख टिकवून ठेवत अनेक क्षेत्रातील भारताचे सर्वोच्च स्थान टिकवून ठेवणे यालाच प्राधान्य असणार आहे. 22 जुलैपासून या अभियानाची सुरुवात होत असून प्रत्येक राज्याने सुध्दा त्यांच्या त्यांच्या संकेतस्थळावर, फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावर याबाबत प्रचार आणि प्रसिद्धी सुरु करावी. हर घर तिरंगा याबाबतची माहिती देत असताना वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया या माध्यमांचा सुद्धा यामध्ये वापर करण्यात येत आहे.

आजादी का अमृत  महोत्सवअंतर्गत ग्राम स्तरावर वेगवेगळया कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेल्या लिस्टमध्ये महाराष्ट्राचा ग्रामविकास विभाग आघाडीवर आहे. आतापर्यंत जवळपास 1 हजारांहून अधिक कार्यक्रम अपलोड करण्यात आले असून जानेवारी 2022 पासून सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फतही 18 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळया स्वरुपातील 35 हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन आतापर्यंत करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी संचालनालयाने महाअमृत www.mahaamrut.orgया नावाने संकेतस्थळ सुरु केले आहे. हर घर तिरंगा उपक्रमासाठी ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना समन्वयक अधिकारी म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. हर घर तिरंगा या उपक्रमाची प्रचार प्रसिद्धी आणि जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी वेगवेगळया माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. जिंगल, सेलिब्रेटीद्वारे आवाहन, विशेष गाणे, डिजिटल प्रचार प्रसिद्धी, सोशल मिडीयावरील हॅशटॅग, जाहिराती इत्यादीचा वापर केला जाणार आहे. याशिवाय स्थानिक रेडिओवाहिन्यांवरुन आणि एमएफ चॅनेलवरुन तसेच दूरदर्शन आणि खाजगी चॅनेलवरुन प्रसिध्दी, शासकीय संकेतस्थळे, लोकसहभाग याद्वारे प्रसिद्धी यावरही भर देण्यात येणार आहे.हर घर तिरंगा या उपक्रमात अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढावा यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींना या अभियानात सहभागी होण्याचे आणि लोकसहभाग वाढविण्याबाबतचे पत्र लिहिलेले आहे.याशिवाय महाराष्ट्रातील दोन कोटी घरांवर तिरंगा फडकविण्याबरोबरच सरकारी, निमसरकारी, शाळा, महाविद्यालये यांच्या इमारतीवरही तिरंगा फडकवला जाणार आहे.

स्वराज्य महोत्सव

आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी राज्यात 9 ते 17 ऑगस्ट 2022 दरम्यान स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. स्वराज्य महोत्सव राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्राम/वॉर्ड पातळीवर साजरा करण्यात येणार आहे. या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरावर प्रामुख्याने हुतात्मा स्मारक सुशोभीकरण करणे,स्थानिक स्वराज्य संस्था विशेष सभा, जिल्ह्याच्या  ठिकाणी तिरंगा बलून सोडणे, डिस्ट्रिक्ट डिजिटल रिपॉसिटरी, 75 फूट उंचीचा ध्वज करणे, एनएसएस, एनसीसी, सायक्लो, मॅरा / वॉकेथॉन आयोजित करणे, विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करणे,वारसा स्थळ पदयात्रा करणे, पुरातत्त्व स्थळांची स्वच्छता करणे, किल्ले येथील स्वच्छता प्रदर्शने आयोजित करण्यात येणार आहेत त्याशिवाय विद्यापीठ स्तरावर कार्यक्रम आयोजित करणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याबरोबर आजादी का अनसग हिरो बुकलेट तयार करणे, कार्यालयांची स्वच्छता करणे आणि  अमृत महोत्सवाचा लोगो शासकीय इमारतीवर लावणे, आणि पुरातत्व  वारसास्थळ दत्तक योजना राबविणे यासारखे कार्यक्रम राबविण्यात  येणार आहेत.  ग्राम स्तर आणि वॉर्ड स्तरावर विशेष सभांचे आयोजन करणे, शाळा/महाविद्यालये/अंगणवाडया, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक इत्यादी यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.ग्रामस्तरावर आणि वॉर्ड  स्तरावर 09 ते 17 ऑगस्ट, 2022 दरम्यान कोणत्या दिवशी कोणते कार्यक्रम आयोजित करावयाचे याच्या तपशीलवार सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.तालुकास्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या विशेष सभा घेणे, वृक्षारोपण आणि वृक्षलागवड करणे, वारसास्थळ आणि पुरातत्व दत्तक  योजना राबविणे यासह विविध कार्यक्रम राबविण्याचे नियोजन आहे.ग्रामपातळीवर विशेष ग्रामसभा घेणे, वॉर्डसभा घेणे, हर घर झेंडा यावर सडा-रांगोळी घालणे, घराला तोरण   बांधणे ,प्रभात फेरीचे आयोजन  करणे, गावाचा इतिहास आणि  राष्ट्राचा इतिहास समाजावून सांगणे,मोबाईल दुष्परिणाम यावर मार्गदर्शन करणे, अर्थ साक्षरता विषयक शिबीर आयोजित  करणे यासह सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करताना प्रबोधनपर आणि देशभक्तिपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

स्वराज्य सप्ताह सांगता समारंभ निमित्त स्वराज्यफेरी, देशभक्तिपर चित्रपट दाखवणे असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय स्वराज्य सप्ताह   अंतर्गत 10 ऑगस्ट रोजी राज्यात शालेय स्तरावर एकाचवेळी समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.स्वराज्य महोत्सव अंतर्गत ग्राम, तालुका व जिल्हा पातळीवर संपन्न झालेले कार्यक्रम केंद्र शासनाच्या https://amritmahotsav.nic.in/ व राज्य शासनाच्या https://mahaamrut.org या संकेत स्थळांवर अपलोड करण्यात येणार आहेत. हर घर तिरंगा आणि स्वराज्य महोत्सव हे उपक्रम मोठया प्रमाणात साजरे करण्यासाठी प्रचार, प्रसिध्दी आणि जाणीव जागृतीचे कार्यक्रम देशभरासह महाराष्ट्रातही हाती घेण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!