उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या शुभेच्छा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ जून २०२२ । मुंबई । खेळ माणसाला शरीराने, मनाने तंदुरुस्त ठेवतात. खेळ हे मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. खिलाडूवृत्तीने वागण्याची शिकवण खेळांमुळे मिळते. सशक्त समाज निर्माण करण्याची ताकद खेळांमध्ये असल्याने महाराष्ट्रात क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार आज जागतिक ऑलिम्पिक दिनी करुया, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, आज जागतिक ऑलिम्पिक दिन साजरा करत असताना, 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र पैलवान खाशाबा जाधवांची मला आठवण होते. पैलवान खाशाबा जाधवांच्या रुपाने देशाला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक महाराष्ट्राने मिळवून दिले होते. ही बाब आनंदाची, अभिमानाची आहे. त्यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी, राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात मिनी ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच राज्याच्या क्रीडा विभागाकडून विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या प्रयत्नांना नक्कीच यश येईल. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राचे खेळाडू देशासाठी पदके जिंकतील, असा मला विश्वास आहे.

जागतिक ऑलिम्पिक संघटना असो की महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना, खेळांच्या माध्यमातून समाजात एकता, समता, बंधुता, खिलाडूपणाची भावना रुजवण्याचा, सुसंस्कृत, समर्थ, सशक्त, निरोगी समाज घडवण्याचा प्रयत्न राज्यातील, देशातील क्रीडा संघटना आणि क्रीडा कार्यकर्ते करत असतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या निमित्ताने राज्यातील क्रीडा कार्यकर्त्यांचेही आभार मानले आहेत.


Back to top button
Don`t copy text!