दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२१ | फलटण | महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी संचलित राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन विडणी (ता.फलटण) येथे केले होते. या कार्यक्रमांतर्गत कृषीकन्या सोनाली राजेंद्र मदने यांनी विडणी (ता.फलटण) गावचे सुपूत्र हनुमंत संतराम अभंग यांनी दूध व्यवसायातून साधलेल्या प्रगतीचा आढावा घेतला.
यावेळी हनुमंत अभंग यांनी सांगितले की, ‘‘1990 साली एक गाय विकत घेवून सेंद्रीय दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. यातून मिळालेल्या नफ्यातून 4 गायी विकत घेतल्या. पुढे दुग्ध व्यवसाय वाढत राहिला. सध्या यावर्षी जरशी जातीच्या 9 गायी असून या गायींच्या संगोपनासाठी दरमहा 35 हजार रुपये खर्च येतो. हा खर्च जाऊन दरमहा दहा हजार रुपये नफा मिळतो व वर्षाला एक लाखापर्यंत हा नफा जातो. शिवाय गायींना कोणत्याही प्रकारचे रासायनिक खाद्य दिले जात नसून केवळ कडवळ, मका, मूरघास हे खाद्य दिले जात असल्याने हे दूध सेंद्रीय आहे. तसेच गायींच्या दूधाचा दर्जा वाढवण्यासाठी किसान अॅग्रो स्पे. मॅश नावाचे सेंद्रिय खाद्य दिले जाते. दर महिन्याला या गायींपासून शेणखताचाही नफा मिळतो.’’
सन 1997 साली सुरु केलेल्या शीतकरण केंद्राच्या व्यवसायाविषयी हनुमंत अभंग यांनी सांगितले की, ‘‘शीतकरण केंद्राला दरमहा 1 लाख रुपये नफा मिळतो. सर्व गायींचे दिवसाला 80 लीटर दूध मिळते. तसेच इतर दूध उत्पादकांकडून शीतकरण केंद्रात 3 हजार लीटर दूध येते. प्रत्येक दूध उत्पादकाला त्यांनी किती लिटर दूध घातले, त्याची डिग्र किती, फॅट किती आदी गोष्टी शितकरण केंद्रातून कळविल्या जातात. तसेच दिवाळीत सर्व दूध उत्पादकांना बोनस वाटपही केले जाते. व्यवसायातील प्रामाणिकपणामुळे चांगले यश संपादन होत आहे.’’
या उपक्रमासाठी कृषीकन्या सोनाली मदने यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.होले, कार्यक्रम समन्वयक डॉ.बी.टी.कोलगणे यांचे मार्गदर्शन लाभले.