‘जय श्रीराम, जय हनुमान’च्या जयघोषात साताऱ्यात हनुमान जयंती उत्साहात साजरी


 साताऱ्यात भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या पवनपुत्र हनुमानाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सूर्योदयाच्या मुहूर्तावर जन्मोत्सव, कीर्तन, रक्तदान शिबिरांसह विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम पार पडले.

स्थैर्य, सातारा, दि. २ एप्रिल : ‘बजरंग बली की जय’, ‘जय श्रीराम’, ‘जय हनुमान’च्या अखंड जयघोषात साताऱ्यात आज (गुरुवारी) श्रीराम भक्त पवनपुत्र हनुमानाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चैत्र पौर्णिमेच्या सूर्योदयाच्या मुहूर्तावर गुलाल आणि फुलांची उधळण करत शहर आणि जिल्ह्यातील विविध हनुमान मंदिरांमध्ये धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.

शहरातील मंदिरांमध्ये आकर्षक सजावट आणि महापूजा

सातारा शहरातील राजवाडा परिसरातील वीर हनुमान मंदिरात जयंतीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. हनुमानाला विशेष चांदीचे अलंकार घालून मंत्रोच्चारात पूजा व अभिषेक करण्यात आला. याशिवाय प्रतापगंज पेठ, करंजे नाका, पवई नाका, जरंडेश्वर नाका, गेंडामाळ, विसावा नाका, मंगळवार पेठेतील मंगल मारुती, शनिवार पेठेतील शनी मारुती, न्यू इंग्लिश स्कूल चौकातील सोन्या मारुती, पंचमुखी हनुमान मंदिर, डोंगरावरील सन्मित्र मारुती, नटराज मंदिरातील दास मारुती, काळा मारुती आणि अजिंक्यतारा किल्ल्यावरील ऐतिहासिक मारुती मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी रांग लागली होती.

कीर्तन, पाळणागीते आणि महारक्तदान शिबिर

यादोगोपाळ पेठ गोल मारुती मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी वेदमूर्ती वैभव उमये यांच्या नेतृत्वाखाली ब्रह्मवृंदांनी मंत्रजागर केला. त्यानंतर सुप्रसिद्ध कीर्तनकार संदीप बुवा मांडके यांचे कीर्तन झाले. आज पहाटे ज्ञानेश धाणोरकर बुवा यांचे कीर्तन पार पडले. विशेष म्हणजे, आज सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

मंगळवार पेठेतील मंगल मारुती मित्र समूहाच्या वतीने ह.भ.प. भास्कर बुवा काणे यांचे कीर्तन झाले. जन्मकाळानंतर महिलांनी पाळण्यात श्रीफळरूपी बाल हनुमानाला घालून जोजविले आणि पाळणागीते गायली. रात्री महाआरती आणि फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली. या आयोजनात नितीन नारकर, उमेश नारकर, मयुरेश नारकर, ईशान नातू यांसह स्थानिक तरुणांचा मोठा सहभाग होता.

जरंडेश्वर, सज्जनगडावर भाविकांची मांदियाळी

कोरेगाव नजीकच्या जरंडेश्वर येथील स्वयंभू हनुमान मंदिरात मध्यरात्रीपासूनच हजारो भाविकांनी पायी कुच करत दर्शनासाठी गर्दी केली होती. देवस्थानचे पुजारी धनंजयगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. तसेच, सज्जनगडावरील मारुती मंदिरातही भव्य जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

समर्थ स्थापित अकरा मारुती आणि जिल्ह्यात उत्साह

कराड तालुक्यातील चाफळ येथील श्रीराम मंदिर, माण तालुक्यातील वावरहिरे, गोंदवले बुद्रुक येथील ब्रह्मचैतन्य महाराज संस्थान तसेच फलटणमधील नाईक निंबाळकर यांच्या श्रीराम मंदिरात हनुमान जयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी मसूर, उंब्रज, चाफळ येथील मंदिरांमध्ये भाविकांनी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. अनेक ठिकाणी महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात आले होते.

 सातारा शहरातील मंगळवार पेठ येथे हनुमान जन्मोत्सव साजरा करताना परिसरातील महिला. (छायाचित्र – अतुल देशपांडे, सातारा)


Back to top button
Don`t copy text!