देशभरातील हस्तकला – शिल्पकला कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध करून आत्मनिर्भर बनवावे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ डिसेंबर २०२१ । मुंबई । प्राचीन भारत कला, शिल्पकला, मृद कला, वास्तुकला, काष्ठ कला, धातू कला, वस्त्र कला अश्या 64 कलांचे माहेरघर होते. दक्षिणेतील विविध मंदिरे तसेच अजिंठा – वेरूळसारख्या लेणी भारतीय कलाकारांनी साकारल्या होत्या. ब्रिटिशांनी स्वतःच्या व्यापाराला चालना देण्यासाठी देशातील विविध हस्तकला संपवल्या. या सर्व कलांचे पुनरुज्जीवन करून कारागिरांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून आत्मनिर्भर बनवण्यासाठी कसोशीने प्रयत्न झाले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

भारतीय एक्झिम बँकेतर्फे मुंबईतील वर्ल्ड ट्रेंड सेंटर येथे रविवारी देशाच्या 20 राज्यातील कलाकारसृजनकार व शिल्पकारांच्या तीन दिवसांच्या ‘एक्झिम बाजार‘ प्रदर्शन – विक्री मेळाव्याचे उद्घाटन करताना राज्यपाल बोलत होते. उद्घाटन सोहळ्याला  एक्झिम बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक हर्षा बांगरीउपव्यवस्थापकीय संचालक एन रमेश व विविध राज्यातील स्टॉलधारक व निमंत्रित उपस्थित होते.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शासनातर्फे विविध कलांच्या पुनरुज्जीवनासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या दिशेने एक्झिम बँक विशेषत्वाने प्रयत्न करीत आहे. देशभरातील कलाकारांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी एक्झिम बँकेने त्यांना आपल्या अधिपत्याखाली आणावे, त्यांचे कौशल्य वर्धन करावे तसेच त्यांच्या उत्पादनांना पॅकेजिंग, पणन व ब्रॅण्डिंगची जोड देऊन मूल्यवर्धित करावे, असे आवाहन राज्यपालांनी केले. राज्यपालांनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सला भेट दिली व कलाकारांशी संवाद साधला.

एक्झिम बँकेतर्फे लुप्त होत चाललेल्या कलाकुसरीच्या संवर्धनाचे कार्य सातत्याने सुरु असून पाच वर्षांपासून एक्झिम बाजार प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे, असे व्यवस्थापकीय संचालक हर्षा बांगरी यांनी सांगितले.  यावेळी उत्तराखंड येथील ‘हिमालय ट्री’  या संस्थेचे सुमन देव व राजस्थानच्या फड कलेचे संवर्धक नंदकिशोर शर्मा यांनी एक्झिम बाजारबाबत आपले अनुभव सांगितले.

भारतीय  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एक्झिम बँकेतर्फे या आठव्या एक्झिम बाजार प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून विविध हस्तकलाकार, धातू कलाकार  व वस्त्र कलाकारांनी 75 स्टॉल्स लावले आहेत. हे प्रदर्शन व विक्री 21 डिसेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. कार्यक्रमाचे संचालन महाव्यवस्थापक धर्मेंद्र साचन यांनी केले तर आभार प्रदर्शन उपव्यवस्थापकीय संचालक एन रमेश यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!