
दैनिक स्थैर्य । दि. ७ ऑक्टोंबर २०२२ । सातारा । जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधनात वाढ करावी यासह अन्य मागण्यासाठी सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी बजाओ आंदोलन केले. यावेळी सरकारच्या चालढकल पणाचा निषेध करण्यात आला.
महागाईचा विचार करता कोर्टाच्या निर्णयानुसार मानधन 12 हजार रुपये करण्यात आले. मिनी सेविकांना समान काम समान वेतन या कायदेशीर व घटनात्मक तरतुदीनुसार नेमणूक करण्यात यावी. आहार बंद आंदोलन सुरू असून अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना जबाबदार न धरता त्यांना 5 महिन्यांची आहार बिले देण्यात यावीत. सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना एक रकमी पेन्शन व थकीत आहार बिले तात्काळ देण्यात यावी. मासिक मानधना एवढी भाऊबीज भेट देण्यात यावी. दिवाळीपूर्वी कोविड प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा. यासह अन्य मागण्यासाठी हलगी बजाओ आंदोलन करण्यात आले.
यावेळी संघटनेचे महासचिव शौकत पठाण, सुजाता रणनवरे, अर्चना अहिरेकर, छाया पन्हाळकर, मनीषा चव्हाण आदी उपस्थित होते.