दैनिक स्थैर्य | दि. १९ मे २०२४ | सातारा |
सुमारे १० लाखांच्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणारा टेम्पो घोगाव (ता. कराड) गावच्या हद्दीत कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतला. ही कारवाई शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. यावेळी पोलिसांनी टेम्पोसह एकास ताब्यात घेतले आहे.
या कारवाईत ९ लाख ६४ हजार ९६० रुपये किमतीची विमल पान मसाल्याची पोती व चार लाख रुपये किमतीचा छोटा हत्ती असा एकूण १३ लाख ६४ हजार ९६० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
समीर बाबासो मुलाणी (वय ३३, रा. लाहोटीनगर, मलकापूर, ता. कराड) असे गुटखा वाहतूकप्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थ, गुटखा आणि दारूबंदी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेस गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, घोगाव गावच्या हद्दीतून गुटख्याची वाहतूक होणार आहे. त्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक सचिन भिलारी, पोलीस हवालदार, सतिश जाधव व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सज्जन जगताप, विनोद माने, सचिन निकम, प्रफुल्ल गाडे, धनंजय कोळी, संदीप पाटील, सनिल माने, नितीन कुचेकर, नाना नारनवर यांनी घोगाव गावच्या हद्दीत सापळा लावला.
पोलिसांना मिळालेल्या माहितीप्रमाणे, छोटा हत्ती टेम्पो वाहन समोरून येताना दिसले. पोलिसांनी ही गाडी थांबवून चालकाकडे विचारपूस केली असता, गाडीमध्ये गुटख्याचा माल घेऊन जात असल्याचे समीर मुलाणी याने सांगितले. पोलिसांनी गाडीत जाऊन पाहिले असता चालकाने पाठीमागील बाजूस कोणास शंका येऊ नये यासाठी तीन कापसाच्या मोठ्या आकाराच्या व पांढर्या रंगाच्या गोण्या रचल्याचे दिसून आले. त्याचे मागील बाजूस विमल गुटख्याचा माल व तंबाखू पुड्या भरलेल्या दिसून आल्या. महाराष्ट्रात गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थाला बंदी असल्याचे सांगून त्याचा चालकाकडे परवाना आहे का विचारले असता, चालकाने परवाना नसल्याचे सांगितले.
पोलिसांनी गाडीतील ९ लाख ६४ हजार ९६० रुपये किमतीची विमल पान मसाल्याची पोती व चार लाख रुपये किमतीचा अशोक लेलंड छोटा हत्ती असा एकूण १३ लाख ६४ हजार ९६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भिलारी करीत आहेत.