
स्थैर्य, सातारा, दि. ०५ : राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या आणि त्यांची समाधी असलेल्या सज्जनगडावर आणि माण तालुक्यातील श्रीक्षेत्र गोंदवले येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या समाधीस्थळी आज रविवारी गुरुपौर्णिमेनिमित्त संस्थांचे पदाधिकारी व विश्वस्तांच्या हस्ते समाध्यांना विशेष पूजा, पवमान पंचसूक्त, पंचामृत अभिषेक ,पूजा, आरती व नेवेद्य संपन्न झाला.
मात्र करोनाचे संकट असल्यामुळे यावर्षी या दोन्ही तीर्थक्षेत्रातील शिष्यांना मात्र आपल्या गुरूंचे दर्शन ऑनलाइन, फेसबुक द्वारे घ्यावे लागले. सज्जनगड येथील श्री समर्थ रामदास स्वामी संस्थांच्या वतीने सकाळी आठ वाजता समाधीची विशेष महापुजा फेसबुक लाईव्ह द्वारे शिष्यांना पाहता आली. तसेच गोंदवले येथील समाधी मंदिरात संस्थानच्या विश्वस्तांनी कडून ही विशेष पूजा संपन्न झाली.
दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत सज्जनगड आणि श्री क्षेत्र गोंदवले हे गुरुपौर्णिमेला भक्तांच्या उपस्थितीने फुलून जात असते .मात्र यावर्षी करोनामुळे सध्यातरी महाराष्ट्रातील देवळे बंद असल्यामुळे या दोन्ही संस्थांनी भक्तांना दर्शनासाठी गुरु पौर्णिमेच्या दिवशी येऊ नका असाच आदेश दिला होता.
सज्जनगड येथील श्री समर्थ रामदास स्वामींचे शिष्य परमपूज्य श्रीधरस्वामी यांच्याकडूनही हजारो भक्तांनी अनुग्रह घेतला असल्यामुळे सज्जनगडावरील त्यांच्या श्रीधर कुटी या मंदिरातही शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात .मात्र यावर्षी या सर्व भक्तांनी आपल्या गुरूंची पूजा घरोघरी साजरी करून गुरुपौर्णिमेला पुजन, वंदन ,नामजप आणि साधना करीत गुरूंना वंदन केले.