सांगलीतील भाष्टेवस्ती-कोकणेवाडी दुर्घटनेच्या छायेखाली; माळीण, इर्शाळवाडी सारखीच परिस्थिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२३ । शिराळा । पुणे जिल्ह्यातील माळीण, रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेसारखीच परिस्थिती शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरातील आरळापैकी भाष्टेवस्ती तसेच कोकणेवाडी येथे निर्माण झाली आहे. या दोन वस्त्या दुर्घटनेच्या छायेखाली वावरत असून, वाडीलगतच्या डोंगरांना भेगा पडून ते खचू लागले आहेत. जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी पाहणी केली आहे. या वस्तीची कायमस्वरूपी उपाययोजना अथवा स्थलांतर केव्हा होणार, याची प्रतीक्षा आहे.

२०१९ मध्ये तहसीलदार गणेश शिंदे यांनी खचलेल्या डोंगराची पाहणी केली होती. परिस्थिती पाहिल्यावर तातडीने भूवैज्ञानिक यांना बोलविण्याचा निर्णय घेतला होता. तहसीलदार शिंदे, वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर धोटे, कनिष्ठ वैज्ञानिक जयंत मिसाळ यांनी पाहणी केली होती. तेव्हा एक थर कठीण दगडापासून सुटलेला आहे. याठिकाणी ओढ्यामुळे डोंगराची झीज वेगाने होत आहे. पाण्यामुळे माती व मुरूम वाहून जात आहे. त्यामुळे अतिवृष्टी झाली की डोंगराचा भाग केव्हाही सुटू शकतो. हा भाग सुटल्यास डोंगर पायथ्याशी असलेल्या चार घरांना व शाळेस मोठा धोका आहे.

भाष्टेवाडी वस्ती येथे दोन ओढ्यांमध्ये जी सात घरे आहेत, तेथील नागरिक व कोकणेवाडी येथील चार घरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहायला जावे लागते.

“जळकेवाडी, बेर्डेवाडी, खोतवाडी परिसरातही थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे. या ठिकाणी दरवर्षी तीन ते पाच हजार मिलिमीटर पाऊस पडतो. दोन-तीन वर्षांपासून येथे पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येथे भूस्खलनाचे संकट आहे. येथील कुटुंबांचे कायमस्वरूपी स्थलांतर होणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे एप्रिलमध्ये मागणी केली आहे. – आमदार मानसिंगराव नाईक, विधानसभा सदस्य, शिराळा

कोकणेवाडी डोंगरास पडलेल्या भेगांचा भाग व त्यावरच्या भागाची पाहणी केली असता ३०० ते ४०० मीटर लांब, १०० मीटर रुंद तसेच २ ते १० मीटर खोल असा डोंगराचा भाग मूळ कठीण खडकापासून सुटलेला आहे. ओढ्यामुळे या भागाची वेगाने झीज होत आहे. मोठा पाऊस पडला तर हा भाग सुटून चार घरे व शाळेस मोठा धोका निर्माण होईल. – दिवाकर धोटे, तत्कालीन वरिष्ठ भूवैज्ञानिक”


Back to top button
Don`t copy text!