स्थैर्य, मुंबई, दि.०१: राज्यातील आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी त्यांच्या ऑनलाईन प्रशिक्षणाची व्यवस्था करा आणि तंत्रशिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कौशल्यविकासमंत्री नवाब मलिक यांच्याकडे पत्राद्वारे केली.
मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, औद्यगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे खंड पडू नये यासाठी त्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. ऑनलाईन मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्या प्रशिक्षणाचा दर्जा उंचावता येईल तसेच त्यांना त्यांच्या विषयातील विविध प्रभावी तंत्रज्ञानाची ओळख होईल.
ते म्हणाले की, तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगारासाठीही मार्गदर्शन मिळणे गरजेचे असून ते ऑनलाईन माध्यमातून होऊ शकते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधींची माहिती मिळेल. गेल्या वर्षी व यंदा लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे परराज्यातील अनेक कुशल कामगारांनी राज्यातून स्थलांतर केले. त्यातील सर्वजण परतले नाहीत. परिणामी स्थानिक तरुणांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन मेळावे उपयुक्त ठरतील.