दैनिक स्थैर्य | दि. ५ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटण येथील अनुबंध कला मंडळातर्फे ‘मदतीचा हात’ उपक्रमांतर्गत सोमवार, दि. ६ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता जनसेवा डायग्नोस्टीक सेंटर येथे देहदान करण्याबाबत मार्गदर्शन व फॉर्म वाटप केले जाणार आहे. यावेळी फलटण औषध विक्रेता संघाचे जिल्हा सदस्य श्री. विजय जाधव मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अनुबंध कला मंडळ गरजू वृद्धांना व रुग्णांना मोफत आरोग्यसेवा पुरवणारा ‘मदतीचा हात’ हा उपक्रम राबविते. या उपक्रमाद्वारे गरजू व्यक्तीने, कुटुंबाने सोबत दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यास खालील सेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात.
- एखादी व्यक्ती एकटीच राहते आहे आणि ती आजारी पडल्यास किंवा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असल्यास, त्याला आजारपणाच्या काळात लागणार्या सर्व प्रकारच्या सोई उपलब्ध करण्यास मदत करण्यात येईल.
- एखाद्या कुटुंबात वृद्ध व्यक्ती आहे आणि त्या कुटुंबास दोन-चार दिवस बाहेरगावी जायचे आहे, त्या काळात संस्थेचे सभासद त्या वृद्धांना किंवा रुग्णांना सर्व सेवा पुरवतील व सहवास देतील.
- विविध आरोग्य सेवा, सवलतीत किंवा मोफत पुरविणार्या संस्थांची सूची व त्यासंबंधी असलेली माहिती गरजूंना पुरवण्यात येईल.
- वृध्द व्यक्ती किंवा जोडपी यांनी विनंती केल्यास त्यांना आवश्यक ती मदत पुरवण्यात येईल.
- ज्या व्यक्तीना अवयव किंवा देहदान करावयाचे असेल त्या व्यक्तीना त्यासाठी कागदपत्रे व इतर पूर्तता करण्यासाठी संस्थेचे सभासद मदत करतील.
गरजूंनी विष्णू शिंदे (९८९०८४१३८८), सौ. रोहिणी धारूरकर (९४२०४८६०८०), हिराचंद गांधी (९०४९६०४९५०), धनाजी जाधव (९६२३३२३४३६), विजय जाधव (९८२३९३८१८२), उस्मान शेख (९१५८८८४७०७) यांच्याशी संपर्क साधावा.