दैनिक स्थैर्य । दि. ०७ नोव्हेंबर २०२२ । सातारा । जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक आदर्श शाळा आणि आदर्श आरोग्य केंद्र उभारणार, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. तारळे येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
आज ग्रामीण भागातील लोकांना उपचारांसाठी कराड किंवा सातारा येथे जावे लागत असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, तर चांगल्या शिक्षणासाठी ही शहरांमध्ये जावे लागते. म्हणूनच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात चांगली अशी आदर्श शाळा आणि सर्व सोयींनी सुसज्ज असे एक आरोग्य केंद्र उभारण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांच्या विकासासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्यादृष्टीने जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. नजिकच्या काळात डोंगरी तालुक्यांचे प्रश्न सोडवण्यात येतील असेही पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले.
यावेळी तारळे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.