स्थैर्य, अमरावती, दि. २४: शहरात कोरोना प्रतिबंधक उपचारांसाठी नवे रुग्णालय उभारण्याच्या कामाला गती देतानाच, सद्य:स्थितीत रुग्णालय, खाटा, इंजेक्शन आदी उपचार साधनसामग्रीचे सुयोग्य नियोजन व्हावे, असे निर्देश पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
अमरावती शहरातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके, महापौर चेतन गावंडे, माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, डॉ.विशाल काळे, डॉ. जयश्री नांदुरकर आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या जुन्या इमारतीत नवे रुग्णालय निर्माण करण्यात येत आहे. त्याच्या प्रक्रियेला गती द्यावी. दरम्यान, संचारबंदीचे काटेकोर पालन होतानाच कोविड सुसंगत जीवनशैलीबाबत भरीव जनजागृती व्हावी. जिल्ह्यात स्टीम सप्ताह राबविण्यात येत आहे. त्याच्या यशस्वितेसाठी पालिकेने सहभाग द्यावा. कुठल्याही रुग्णाला लक्षणे जाणवताच वेळीच निदान, तसेच उपचार होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने रूग्णालयांना सूचना द्याव्यात, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
रेमडेसिवीरचा काळा बाजार थांबविण्यासाठी भरारी पथकाकडून सरप्राईज व्हिजीट, प्रत्येक इंजेक्शनची नोंद तपासणे आदी कार्यवाही व्हावी, असेही निर्देश त्यांनी दिले.