स्थैर्य, नागपूर, दि.१८: शालिनीताई मेघे रुग्णालय व अनुसंधान केंद्र वानाडोंगरी येथे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत व विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी भेट दिली. रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्थेचा यावेळी त्यांनी आढावा घेतला.
रुग्णालयातील कोविडग्रस्त रुग्णांची माहिती यावेळी अधिष्ठाता डॉ. दिलीप गोडे यांनी पालकमंत्र्यांना दिली. 350 बेडची क्षमता असलेल्या या रुग्णालयात 322 कोविड रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी 120 रुग्णांना रेमडेसिवीरद्वारे उपचार सुरु आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन सुविधेविषयीही माहिती त्यांनी दिली.
यावेळच्या कोविड लाटेमध्ये तरुण वयोगटातील मृतांची संख्या जास्त असल्याचे डॉ. गोडे यांनी सांगितले. टास्क फोर्सतर्फे दिलेल्या सर्व सूचनांचे पालन रेमडेसिवीरचा उपयोग करताना करण्यात येत आहे. अधिक ऑक्सिजनच्या पुरवठ्याची गरज असल्याचे यावेळी पालकमंत्री यांना सांगितले. 22 मार्चपासून आजपर्यंत 66 मृत्यूची नोंद या रुग्णालयात झाली आहे. अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाची मदत घेण्याची सूचना पालकमंत्री डॉ. राऊत यांनी रुग्णालय प्रशासनाला केली.