दैनिक स्थैर्य । दि. ०९ मे २०२३ । पुणे । पुणे शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या नागझरी नाल्यातील पूरपरिस्थितीबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश पाटील, श्रमदान मारुती मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, नागझरी आजुबाजूला असलेल्या नागरिकांच्या घरात पाणी नाल्यातील पाणी गेल्यामुळे त्यांचे जनजीवन विस्कळीत होते. त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नाल्याचे रुंदीकरण, खोलीकरण आणि स्वच्छता जून महिन्याअखेर पूर्ण करा. नाल्याच्या भोवती असलेली अतिक्रमणे तात्काळ काढण्याची कार्यवाही करा. मान्सून कालावधीत नाल्यातील पाण्यासोबत येणाऱ्या कचरा उचलण्यासाठी कर्मचाऱ्याची नियुक्ती करा, अशा सूचना देऊन ते पुढे म्हणाले, कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी 57 कोटी रुपयांची आवश्यकता असून हा निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले.