सार्वजनिक विकासकामे गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण करण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले निर्देश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑक्टोबर २०२३ | बारामती |
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरातील जवाहरबाग ते परकाळे बंगला येथील कॅनॉलचे सुशोभीकरण व सेंट्रल पार्क येथील विविध विकासकामांची पाहणी करून अधिकार्‍यांना कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

विकासकामांची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकार्‍यांकडून कामाबाबत माहिती घेतली. सार्वजनिक विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील, याकडे लक्ष द्यावे. जवाहरबाग ते परकाळे बंगला येथील कॅनॉल दरम्यान बांधण्यात येणार्‍या पायर्‍यांवरून पाण्याचा व्यवस्थितपणे निचरा होईल, अशी रचना असावी. परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकार्‍यांना दिल्या.

नवीन प्रशासकीय भवन शेजारी उभारण्यात येणार्‍या सेंट्रल पार्कचे सादरीकरण बघितल्यानंतर अजित पवार म्हणाले, सेंट्रल पार्क येथे ४० मीटर उंचीचा मनोरा (वॉच टॉवर) उभारण्यात येणार असून यावर चढउतार करताना नागरिकांच्या सुरक्षितेकडे लक्ष द्यावे. येथील बैठक व्यवस्था, पदपथ, प्रेक्षागृह, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान बालकांसाठी उभारण्यात येणारे पार्क आदी कामे करताना गर्दीचे योग्यप्रकारे नियोजन करावे, असे निर्देशही पवार दिले.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे संचालक सचिन सातव आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!