दैनिक स्थैर्य । दि. ०७ डिसेंबर २०२१ । मुंबई । जीवित हानी रोखण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील भूस्खलन होण्याची किंवा दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या धोकादायक ठिकाणांची तातडीने निश्चिती करावी. तसेच ज्या जागा अति धोकादायक आहेत तेथे संरक्षक भिंतीसह इतर उपाययोजना करण्याची कामे तातडीने सुरू करण्यात यावीत, असे सांगून या कामांसाठी ६१.४८ कोटींच्या खर्चास मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मंजुरी दिली.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील भूस्खलन होणाऱ्या धोकादायक ठिकाणी करावयाच्या उपाययोजनांबाबत श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासह मुंबई महानगरपालिका, म्हाडा, भारतीय भूवैज्ञानिक, भौगोलिक सर्वेक्षण संस्था आदी कार्यालयांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुंबई उपनगर जिल्ह्यात भूस्खलन होणारी एकूण ५७ ठिकाणे आहेत. त्यातील प्राधान्यक्रमानुसार अति धोकादायक ४५ ठिकाणी संरक्षक भिंतींसाठी ६१.४८ कोटी रूपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत निर्देश देण्यात आले. या ठिकाणांची तातडीने निश्चिती करावी, तसेच या कामांसाठी नोडल अधिकारी नेमून पुढील मान्सूनपूर्वी दर्जेदार पद्धतीने ही कामे पूर्ण व्हावीत, असेही श्री. ठाकरे यांनी सांगितले. या कामांसाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता भासल्यास शासन पातळीवर प्रयत्न करण्यात येईल, असेही ते म्हणाले. संरक्षक उपाययोजनांच्या ८.८० कोटींच्या कामांना यापूर्वी मंजुरी देण्यात आली आहे.
धोकादायक ठिकाणी यापुढे दुर्घटना होऊ नयेत यासाठी ही कामे करावयाची आहेत, त्यादृष्टीने कामांची आवश्यकता आणि सर्वंकष बाबी तपासून ही कामे करावीत असे सांगून श्री. ठाकरे यांनी भिंतींना लागून अतिक्रमण होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचेही निर्देश दिले.
परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी संरक्षक भिंती बांधताना पाण्याचा योग्य निचरा होईल, याची दक्षता घेण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली.