मुधोजी क्लबच्या नूतन वास्तूचे उद्या भूमिपूजन; फलटणच्या वैभवात पडणार भर

विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार समारंभ


स्थैर्य, फलटण, दि. ०५ ऑगस्ट : फलटण शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात महत्त्वाचे स्थान असलेल्या मुधोजी क्लबच्या भव्य नूतन वास्तूचा भूमिपूजन समारंभ उद्या, गुरुवार, दि. ०७ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. महात्मा फुले चौकातील क्लबच्या जागेत हा कार्यक्रम संपन्न होणार असून, या वास्तूमुळे शहराच्या वैभवात आणखी भर पडणार आहे.

या भूमिपूजन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे माजी सभापती व मुधोजी क्लबचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबच्या उपाध्यक्षा श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर असणार आहेत. तसेच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.

या नूतन वास्तूमध्ये सभासदांसाठी आणि नागरिकांसाठी अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. मुधोजी क्लबचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्री. राजीव नाईक निंबाळकर, खजिनदार श्री. हेमंत भोसले यांच्यासह सर्व विश्वस्त आणि पदाधिकारी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

भूमिपूजन समारंभाची तयारी पूर्ण झाली असून, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी क्लबचे सभासद आणि फलटण शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुधोजी क्लबच्या व्यवस्थापन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!