स्थैर्य, मुंबई, दि ६ : दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त
सागराशी स्पर्धा करणारा भीमसागर येथे येतो. परंतु कोरोनामुळे वेगळी
परिस्थिती आहे. त्यामुळे भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे व संयमाचे दर्शन
घडविले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चैत्यभूमी येथे
अभिवादन करताना केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण
दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय
राज्यमंत्री रामदास आठवले तसेच खासदार शरद पवार यांनी चैत्यभूमी येथे डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, भारतरत्न डॉ .बाबासाहेबांच्या
दूरदृष्टीपणाला आणि एकूणच त्यांच्या कार्याला मी विनम्रपणे अभिवादन करतो
आणि सर्वांनी शिस्तीचे पालन केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.
यावेळी राज्यपाल म्हणाले, कोरोनामुळे सर्व जग त्रस्त आहे, सगळ्या जगात
भारतापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होत आहे आणि भारतात त्या मानाने मृत्यू
संख्या कमी आहे याचे कारण एकच आहे की, भगवान बुद्धांनी करुणा, दयेचा
जो विचार लोकांना दिला हाच विचार बाबासाहेबांनी स्वीकारला, आणि याच
विचारांच्या आधाराने आपण कोरोनाला हरवू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
श्रमाने आणि बलिदानाने पुन्हा एकदा आपला देश नवे शिखर गाठेल, सर्वजणांनी
एकत्र येऊन बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करू, आज संपूर्ण देश त्यांना
अभिवादन करीत आहे. माझे ही त्यांना विनम्र अभिवादन.
यावेळी श्री अजित पवार म्हणाले राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक
विविधता असलेल्या आपल्या देशाला एकसंघ, एकजूट, सार्वभौम ठेवण्याचं संपूर्ण
श्रेय भारतीय राज्यघटनेला आणि बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला आहे. एक
शक्तिमान देश म्हणून भारताची ओळख जगात व्हावी हे बाबासाहेबांचे स्वप्न
पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध होवू या. त्याचबरोबर इंदू मिल येथील डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न
करीत आहोत .
तसेच यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत, शालेय शिक्षणमंत्री वर्षा
गायकवाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर
यांनी ही आपले मनोगत व्यक्त करून अभिवादन केले. या अभिवादन
कार्यक्रमाला मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगराचे
पालकमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, मुबंईच्या महापौर
किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इकबाल चहल आदी उपस्थित होते.