स्थैर्य, मुंबई, दि. २३ : महाराष्ट्राच्या भूमीत मराठी मावळ्यांचं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न सर्वात पहिल्यांदा शहाजीराजेंनी पाहिलं. ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा, ताकद दिली. शहाजीराजे शूर, धाडसी, पराक्रमी, विद्वान होते. रणांगणात शौर्य गाजवण्याबरोबरच राजकारण, मुत्सद्देगिरीतही कुशल होते. ते न्यायप्रिय होते. जनतेचं हित कशात आहे हे जाणण्याची दूरदृष्टी त्यांच्याकडे होती.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे संकल्पक म्हणून शहाजीराजे सदैव स्मरणात राहतील. महाराष्ट्राला प्रेरणा देतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहाजीराजांच्या कर्तृत्वाचे स्मरण करुन त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले.