कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वातंत्र्यदिनी मान्यवरांच्या हस्ते सत्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी प्रशासनाला साथ देताना प्रबोधन, मार्गदर्शन व वस्तूरूप किंवा रोख स्वरूपात देणगी, मदत, सहकार्य करणार्‍या व्यक्ती व संस्थांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वातंत्र्यदिनी तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीच्यावतीने अशा संस्था, व्यक्तींचे कोरोना योद्धा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन आ. दीपक चव्हाण, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, प्रभारी तहसीलदार रमेश पाटील व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. 

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, फलटण सेंटरने फलटण शहर व तालुक्यात सामाजिक बांधिलकी जपून अन्नधान्याचे किट, औषध फवारणी, रक्तदान व इतर मदत नगरपालिका व प्रांताधिकारी कार्यालय यांना केली. सुमारे 600 परप्रांतीय कामगारांची 2 महिने अन्नधान्याची, राहण्याची व गावी परत जाण्यासाठी प्रवास खर्चाची व्यवस्था केली याची नोंद घेऊन संस्थेचे व्हाईस चेअरमन राजेंद्र कापसे, प्रमोद निंबाळकर यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

फलटण तालुका व्यापारी महासंघाचे जॉइंट सेक्रेटरी राजेंद्र कोठारी (बुधकर) यांचा व याकामी लायन्स क्लब, के. बी.एक्स्पोर्ट, श्रीराम साखर कारखाना, स्वराज अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज, गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस, पांडुरंग गुंजवटे व ऋषिराज नाईक-निंबाळकर यांना तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीच्यावतीने सन्मानित करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. फलटण तालुक्यातील पोलीस पाटील आशा सेविका, अंगणवाडी सेविकांनी गावपातळीवर कोरोना नियंत्रण, नियोजन, प्रबोधन व व्यवस्थापन याकामी केलेले काम निश्चित प्रेरणादायी व उपयुक्त आहे. 

त्यासाठी सर्वांचा यथोचित सन्मान करण्याची आवश्यकता आहे. तथापी फिजिकल डिस्टन्सिंग व अन्य बाबी सांभाळण्यासाठी या सर्वांना येथे निमंत्रित न करता त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचे यथोचित कौतुक व कृतज्ञता व्यक्त करण्यात आल्याचे प्रभारी तहसीलदार रमेश पाटील यांनी सांगितले. दरम्यान गावपातळीवर संबंधित ग्रामपंचायतींनी ध्वजारोहण कार्यक्रमातच पोलीस पाटील यांचे सन्मानपत्र देवून सत्कार केले आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!