स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि १३: “आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यांच्या नेतृत्वं आणि कर्तृत्वानं महाराष्ट्राच्या कृषी, औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकासाचा पाया रचला. पंचायतराज व्यवस्थेच्या माध्यमातून ग्रामीण नेतृत्वाची फळी निर्माण केली. सहकार चळवळीच्या माध्यमातून शाश्वत विकासाची दिशा दाखवली. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांना उदारमतवादाचे संस्कार दिले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रगत, पुरोगामी विचारातूनच आजचा संपन्न, सुसंस्कृत, बलशाली महाराष्ट्र घडला आहे”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कार्याचे स्मरण करुन जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, स्वर्गीय चव्हाण साहेब हे राज्याला व देशाला लाभलेले द्रष्टे, कर्तृत्ववान नेते होते. ते कृतीशील विचारवंत, उत्तम संसदपटू, कुशल प्रशासक, सिद्धहस्त लेखक, कलारसिक होते. राजकीय, सामाजिक चळवळीत वैचारिक आदानप्रदानाची, उदारमतवादाची संस्कृती रुजवण्याचं काम त्यांनी केलं. राज्याचा पायाभूत विकास करताना सांस्कृतिक विकासावरही भर दिला. संरक्षणमंत्री म्हणून देशाच्या संरक्षणसिद्धतेसाठी त्यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या  विचारांवर वाटचाल करीत त्यांच्या स्वप्नातील संपन्न, सुसंस्कृत, बलशाली महाराष्ट्र घडवण्यासाठी दृढसंकल्प होऊया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!