स्थैर्य, धुळे, दि.१०: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील मंगळवारी पक्षाच्या परिवार संवाद कार्यक्रमानिमित्त शहरातील राष्ट्रवादी भवनात आले होते. त्या वेळी कार्यकर्त्यांनी सत्कार व फाेटाे सेशनवेळी बेशिस्तीचे दर्शन घडवले. त्यामुळे दुपारी दाेन वाजेपासून थांबलेल्या कार्यकर्त्यांकडून पक्षाच्या कामाचा अाढावा न घेता मी पुन्हा येईन असे अाश्वासन देत मंत्री जयंत पाटील यांनी काढता पाय घेतला. ते केवळ दहा ते पंधरा मिनिट राष्ट्रवादी भवनात थांबले. या वेळी सत्कार व फाेटाे काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी रेटारेटी केली. त्यामुळे एकनाथ खडसेही हतबल झाल्याचे दिसून अाले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा चाळीसगाव येथील कार्यक्रम लांबला. त्यामुळे त्यांना शहरात येण्यास विलंब झाला. ते चार वाजेच्या सुमारास आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. सायंकाळी सहा वाजता ते राष्ट्रवादी भवनात पाेहाेचले. याठिकाणी दुपारी दाेन वाजेपासून कार्यकर्ते त्यांची वाट पाहत थांबले हाेते. तसेच वरच्या मजल्यावरील सभागृहात पक्षाच्या विविध अाघाडी, सेलच्या पदाधिकाऱ्यांकडून मंत्री पाटील आढावा घेणार होते. जयंत पाटील राष्ट्रवादी भवनात आल्यावर कार्यकर्त्यांनी सत्कारासाठी रेटारेटी सुरू केली. शहर जिल्हाध्यक्ष रणजित भाेसले यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. पायऱ्यावर काही जुने कार्यकर्ते, नगरसेवकांनी हार घालून सत्कार केला. मंत्री पाटील यांना हार घालण्यासाठी व फाेटाे काढतांना गाेंधळ झाला. या गोंधळातच मंत्री पाटील अाणि इतर पदाधिकारी राष्ट्रवादी भवनाच्या वरच्या मजल्यावर पाेहाेचले. त्याठिकाणी दुपारपासून कार्यकर्ते, पदाधिकारी व महिला थांबल्या होत्या. व्यासपीठावर अनिल गाेटे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी बसलेले हाेते. जयंत पाटील येताच पुन्हा तेथे रेटारेटी झाली. त्या गाेंधळात काँग्रेसचेही काही कार्यकर्ते सत्कारासाठी पुढे अाले. त्यांनी सत्कार केला.
त्यानंतर अनेकांनी व्यासपीठाजवळ जयंत पाटील यांचा सत्कार करण्यासह फाेटाे काढण्यासाठी गर्दी केली. त्यानंतर मंत्री जयंत पाटील यांनी माईकचा ताबा घेतला. कार्यकर्त्यांना पाच ते सहा मिनिट मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अन्यायाविरूध्द, शहराच्या विकासासाठी अाक्रमक व्हावे. शहरात चांगले कामे झाली पाहिजे. पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करावेत असे स्पष्ट करत अाढावा घेण्यासाठी मी पुन्हा येईल असे सांगत कार्यक्रमस्थळाहून काढता पाय घेतला. त्यानंतरही सत्कारासाठी कार्यकर्त्यांचा गाेंधळ सुरूच हाेता. त्यामुळे मंत्री पाटील यांना भवनातून बाहेर पडण्यासाठी दहा मिनिटे लागली. परिवार संवादासाठी अालेल्या मंत्री जयंत पाटील यांनी दहा मिनिटांच्या कार्यक्रमात शहर जिल्हाध्यक्ष रणजित भाेसले यांच्या संघटन काैशल्याचे काैतुक केले.
गोटे, शिंदे व पाटलांमधील मतभेद मिटवा; कार्यकर्त्यांनी केले आवाहन
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे व जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील यांच्यात पक्षांतर्गत मतभेद आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची वाढ खुंटली आहे. पक्षवाढीसाठी अचडणी निर्माण झाल्या आहेत. कार्यकर्त्यांमध्ये देखील गट पडले आहेत. गतवैभव प्राप्त होण्यासाठी अनिल गोटे आणि किरण शिंदे व किरण पाटील यांच्यातील मतभेत संपुष्टात आणावेत, असे आवाहन कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना केले.
केशरानंद गार्डन येथे कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, युवती प्रदेश सक्षणा सरगर, समन्वयक सुरज चव्हाण,कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील, संदिप बेडसे, माजी आमदार रामकृष्ण पाटील, शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, सचिव सुरेश सोनवणे, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेता पोपटराव सोनवणे, सत्यजित सिसोदे, कुणाल पवार, मयूर बोरसे, प्रा.सुवर्णा शिंदे, एन. सी. पाटील, गटनेते कमलेश देवरे,अनिल मुंदडा, रईस काझी, कैलास चाैधरी उपस्थित हाेते. जयंत पाटील यांनी शहराध्यक्ष रणजित भोसले यांच्या कामाचे कौतुक केले. तर किरण शिंदे व किरण पाटील यांना ग्रामीण भागात अजून काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. कदमबांडे यांनी पक्ष का सोडला हे अजून समजलेले नाही, त्यांनी पक्ष मोठा केला. त्यांना पक्षाने देखील भरभरून दिले. कदमबांडे यांच्या जागेवर अनिल गोटे पक्षात आले आहेत. त्यांनी संघटना बांधणीचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याचे सांगत गोटे यांच्या कामाचे कौतुक केले. मेळाव्यात पक्ष कामगिरीचा आढावा सुरू असताना कार्यकर्त्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांनाच सूचना केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलक शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणत सर्व आंदोलक शेतकऱ्यांची केलेली हेटाळणी निंदनीय आहे. पंतप्रधानांवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घणाघात केला.
गाेटे स्पष्ट बाेलत असल्याने हाेते अडचण
काही मिनिटांच्या भाषणात अनिल गाेटे यांचाही उल्लेख जयंत पाटील यांनी केला. ते म्हणाले की, अनिल गाेटे यांच्यासारखे अाक्रमक नेते पक्षात अाहे. ते स्पष्ट बाेलतात. त्यामुळे अनेकांना त्यांचा रागही येताे. मात्र, काही वेळानंतर त्यांचा राग शांत हाेताे. त्यांच्या बाेलण्यामुळे पदाधिकाऱ्यांना काम करतांना अडचणी येत असतील, असे सांगत त्यांचे मार्गदर्शन घ्यावे असाही सल्ला मंत्री पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.
बैठकीला दोन्ही गटाचे कार्यकर्ते…
कार्यक्रमाला अनिल गाेटे, माजी मंत्री एकनाथ खडसे, उन्मेष पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते. शिंदखेडा तालुक्यात गाेटे अाणि बेडसे यांच्यात हाेणारी पत्रकबाजी व गटबाजीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बैठकीला अनिल गाेटे यांच्यासह त्यांचे समर्थक उपस्थित हाेते.
व्यासपीठासमोर कार्यकर्त्यांचा राडा
मेळाव्यादरम्यान, भूषण पाटील यांनी पक्षांतर्गत नेते व कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या परस्परविरोधी कारवायांची माहिती देण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी नवलाणे (ता.धुळे) या ग्रामपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत वैरभाव ठेवून पक्षातील कार्यकर्त्यांनी कसे आपसातच एकमेकांच्या विरोधात काम केले, याचा पाढा वाचला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी पाठीमागून येत भूषण पाटील यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या हातातील माईक देखील हिसकावला. यावेळी त्यामुळे मेळाव्यात प्रचंड गोंधळ उडाला.