डेटाच्या उत्तम वापरातूनच व्यापक विकास शक्य – शेर्पा अमिताभ कांत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ डिसेंबर २०२२ । मुंबई । माहिती तंत्रज्ञानाच्या जगात डेटाच्या (माहितीच्या) उत्तम वापरातून देशाचा व्यापक विकास शक्य होणार आहे, उपलब्ध माहितीच्या आधारे प्रत्येक क्षेत्रानुसार त्याचे विश्लेषण करता येऊ शकते. विकसनशील देशाचा विकास करायचा असेल तर डेटा (अद्ययावत माहिती) संकलित करणे, त्याचे विश्लेषण, संप्रेषण करणे आणि उपलब्ध डेटावर कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या विकासासाठी एक स्पर्धा निर्माण होईल आणि त्यातून विविध क्षेत्रात बदल दिसून येईल, असे मत वार्षिक जी – २० परिषदेत शेर्पा अमिताभ कांत यांनी व्यक्त केले.

बांद्रा -कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे  जी-२० परिषदेची आज  सुरुवात झाली. या परिषदेच्या पहिल्या सत्रात डेटा फॉर डेव्हलपमेंट : रोल ऑफ जी २० इन ॲडव्हान्सिंग द २०३० अजेंडा विषयावर आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी श्री. कांत बोलत होते.

श्री. कांत पुढे म्हणाले की, प्रशासनात सामान्य नागरिकांच्या कल्याणकारी योजना राबवीत असताना समर्पक डेटा (अद्ययावत माहिती) उपलब्ध असल्यास योजना प्रभावीपणे राबविणे शक्य होते. आता सुप्रशासनासाठी एक स्पर्धात्मक वातावरण तयार झाले असून याचा फायदा सामान्य नागरिकांना होत आहे. मात्र, यासाठी असलेला सर्व डेटा विखुरलेला असल्याने याचे एकत्रित संकलन करणे आणि योग्य वापर करून थेट नागरिकांना लाभ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

विकसनशील देशाचा विकास करायचा असेल तर डेटा निर्माण होणे, त्याचे विश्लेषण, संप्रेषण करणे आणि उपलब्ध डेटावर कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर करणे आवश्यक आहे. याचबरोबर सुप्रशासन डेटा गुणवत्ता इंडेक्स सातत्याने तपासत राहणे आवश्यक आहे. जी २० परिषदेत या विषयावर सांगोपांग चर्चा होऊन काही दिशादर्शक निष्कर्ष नक्कीच निघतील अशी आशा श्री. कांत यांनी यावेळी व्यक्त केली.

केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जी २० परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी भारताला मिळणे ही अभिमानाची बाब आहे. विकसनशील देशांमध्ये ‘डेटा’संबंधित क्षमता-निर्मितीवर भर देण्यात आला असून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सरकारी-खासगी भागीदारीमुळे भारताच्या ‘डिजिटल पेमेंट’ प्रणालीने नागरिकांच्या जीवनात व्यापक बदल घडवून आणले आहेत. त्यामुळेच ‘कोविड-१९’ साथीच्या काळात अवघ्या काही सेकंदांत गरजू लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये मदत निधी देणे भारताला शक्य झाले आहे असेही ते म्हणाले.

भारताच्या ‘जी २०’ परिषदेत अध्यक्षपदाच्या कार्यकाळात ‘विकास कार्य गट’ हा, विकसनशील देशांमध्ये ‘डेटा’संबंधित क्षमता-निर्मितीवर लक्ष केंद्रित करेल आणि विकासासाठी माहितीचे आदान-प्रदान या आधारे बहुमुखी व मानव केंद्रित शाश्वत विकासाला चालना देईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या परिषदेचे प्रस्ताविक करताना ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष समीर सरन म्हणाले की,  ही परिषद देशांना एकसंघता, शाश्वत विकास आणि समृद्धीच्या दिशेने नेणारी ठरणार आहे. ‘वसुधैव कुटुंबकम् : एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही या परिषदेची संकल्पना आहे. याच संकल्पनेतून आणि दृष्टिकोनातून वातावरणासंबंधी आव्हाने, शांतता आणि शाश्वत विकासाच्या मार्गावरील आव्हानांवर आंतरराष्ट्रीय सहकार्य  आणि  सांघिकरित्या मात करण्यासाठी एक ‘सर्वंकष आराखडा २०३०’ मांडण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

नेदरलँडसच्या महाराणी क्वीन मॅक्सिमा म्हणाल्या की, डेटा वापर करून आर्थिक उन्नती साधता येते. वित्तीय समावेशन हे कोणत्याही देशाच्या विकासाचे शक्तिशाली साधन आहे. शाश्वत विकासाची उद्दिष्टे म्हणजे  शून्य गरिबी, चांगले आरोग्य, लिंग समानता आणि आर्थिक वाढ डेटाच्या नियोजनातून साध्य करता येऊ शकेल.

नंदन नीलकेणी म्हणाले की, आधार तसेच जनधन या सारख्या योजनेतून देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत ‘डिजिटल’ माध्यमातून  थेट लाभ देता आला. या  ‘इको सिस्टम’चा समावेश असलेले नवनवीन तंत्रज्ञान भारतीय ‘स्टार्टअप्स’ शोधून काढत आहेत. विकासासाठी माहितीच्या आदान-प्रदानाला प्रोत्साहन देण्याच्या धारणेमुळे भारताने  अनेक मुक्त-स्रोत मंच जगासाठी खुले करण्यासह संयुक्त राष्ट्रांच्या मदतीने,  विकसनशील देशांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी ‘जी २०’ ची क्षमता निर्माण करणारी यंत्रणा उभी करण्यात पुढाकार घेतला आहे.

या पहिल्या सत्रात दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून नेदरलँडसच्या महाराणी क्वीन मॅक्सिमा, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर, नॉन एक्झिक्युटिव अध्यक्ष, तथा इन्फोसिसचे माजी अध्यक्ष तसेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीआय)चे  नंदन नीलकेनी यांनी ऑनलाइन संदेश दिला. तर ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष समीर सरन हे प्रत्यक्ष सहभागी होते. याचबरोबर २० देशातील मान्यवर पाहुणे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!