स्थैर्य, कोरेगाव दि.११ : संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाचा विश्वात्मक विचार महाराष्ट्रात घरोघरी पोहोचवला. याच विचारांनी आजच्या पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण झाली असल्याचे प्रतिपादन जिल्हापरिषदेचे माजी शिक्षण सभापती, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव चव्हाण यांनी केले.
भिवडी (ता. कोरेगाव) येथे आनंदराव शेलार स्मृती संगीत सेवारत्न पुरस्कार ज्येष्ठ भजन गायक ह.भ.प.सत्वशील यादव (कडेपूर, जि. सांगली) यांना प्रल्हादराव चव्हाण यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा मध्य. सह. बँकेचे माजी उपाध्यक्ष दादासाहेब गोडसे, जिल्हा दूध संघाचे संचालक राजूभाई मुलांनी, बाबुराव शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना चव्हाण पुढे म्हणाले की, स्व. आनंदराव बुवा शेलार यांनी धोम धरणग्रस्तांच्या सुयोग्य पुनर्वसनासाठी मोठी चळवळ उभी केली होती. राज्यकर्त्यांच्या माध्यमातून विस्थापितांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान धरणग्रस्तांना विसरता येणार नाहीत. आनंदराव शेलार यांचा मूळ पिंड अध्यात्मिक होता. ते उत्कृष्ट भजन गायकही होते असे सांगून चव्हाण यांनी भजनाच्या संस्कारातुन सुसंस्कृत समाज निर्माण होतो, आनंदराव शेलार यांच्या स्मृती जतन करताना ही भजन परंपरा सुरु ठेवल्याबद्दल त्यांचे कुटुंबीय व संयोजकांना धन्यवाद दिले पाहिजेत.
यावेळी बोलताना बाबुराव शिंदे यांनी धरणग्रस्तांच्या त्यागातुन महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाल्याचे सांगून त्यांचे ऋण कधीही विसरता येणार नाहीत याची जाणीव करुन दिली.
दरम्यान स्व.आनंदरावबुवा शेलार यांच्या पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त सकाळी श्री. भैरवनाथ प्रासादिक भजन मंडळाचा कार्यक्रम झाला व सायंकाळी उदयोंन्मूख भजन गायक सदानंद गायकवाड व मृदंगाचार्य संदीप जाधव यांनी ‘भजनसंध्या’ हा बहारदार भजनाचा कार्यक्रम सादर केला. तसेच ह.भ.प.सत्वशील यादव यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्पहार व रोख रक्कम देऊन संगीत सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे संयोजक राजेंद्र शेलार यांनी प्रास्ताविक केले व ह.भ.प. उत्तम शेलार यांनी आभार मानले. यावेळी धरणग्रस्त सरपंच संघटनेचे अध्यक्ष मंगलदास गायकवाड, वाई तालुका युवा वारकरी संघटनेचे अध्यक्ष मारुती चोरट, ज्येष्ठ कार्यकर्ते बाबुराव काटकर, ज्ञानदेवशेठ सणस, गायक बाबा जगदाळे, नितीन भंडारे, खावलीचे माजी सरपंच राजाराम शेलार आदी मान्यवर व भिवडी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.