
स्थैर्य, फलटण, दि. ६ ऑक्टोबर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर, येथील लायन्स क्लब संचलित माळजाई मंदिर व उद्यान समितीने ‘भव्य किल्ले स्पर्धा व प्रदर्शन २०२५’ चे आयोजन केले आहे. ही स्पर्धा आज, दि. ६ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत माळजाई मंदिर परिसरात होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांनी दिली.
किल्ले बांधणीच्या परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गड-किल्ल्यांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, स्पर्धकांना किल्ले बनवण्यासाठी १० बाय १० फुटांची जागा दिली जाणार आहे. स्पर्धेसाठी लागणारे साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणायचे आहे.
आकर्षक बक्षिसे व प्रत्येकाला प्रमाणपत्र
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकास ९,९९९ रुपये, द्वितीय क्रमांकास ७,७७७ रुपये, तृतीय क्रमांकास ५,५५५ रुपये आणि चौथ्या क्रमांकास ३,३३३ रुपये रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी प्रवेश फी केवळ १०१ रुपये आहे. फलटण शहर व तालुक्यातील सर्व किल्लेप्रेमींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी समितीच्या सदस्यांशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.