दैनिक स्थैर्य । दि. १७ मे २०२२ । मुंबई । समाजात प्रचलित असलेली अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ठराव ग्रामसभेमध्ये ठेऊन कोल्हापूर जिल्ह्याच्या हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केली. आता अन्य ग्रामपंचायतींना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये प्रागतिक विचाराचे स्वागत होणे महत्त्वाचे आहे. जुन्या बुरसटलेल्या प्रथा परंपराना विज्ञानवादी युगामध्ये स्थान असता कामा नये, असे सांगून हेरवाड ग्रामपंचायतीप्रमाणे राज्यातील अन्य ग्रामपंचायतीनी याचे अनुकरण करून तसा ग्रामसभेने ठराव करण्याचे आवाहन राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कोल्हापूर जिल्ह्याच्या हेरवाड ग्रामपंचायतीने दिनांक 5 मे 2022 रोजी विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केला. सदर ग्रामपंचायतीने केलेली हे कृती स्तुत्य असल्याने या ग्रामपंचायतीचे मंत्रीमहोदयांनी अभिनंदन केले. आज कुप्रथांचे पालन होत असल्याने अशा व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे जीवन जगण्याच्या मानवी अधिकारांचे तसेच भारतीय संविधानाने बहाल केलेल्या समतेच्या हक्काचेही उल्लंघन होते. त्यामुळे अशा प्रथेचे निर्मुलन होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे हेरवाड ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावाप्रमाणेच अन्य ग्रामपंचायतींनी या निर्णयास आदर्श मानून समाजातील कुप्रथा बंद करून महिलांचे जीवन सुकर आणि आनंदी करण्याचे समाजोपयोगी निर्णय घ्यावेत, असेही आवाहन मंत्री श्री.मुश्रीफ यांनी केले. या संदर्भातील परिपत्रक ग्रामविकास विभागाने निर्गमित केले आहे.