स्थैर्य, कराड, दि. 31 : कोरोनाग्रस्त (कोविड 19) रुग्ण गावोगावी सापडत असल्याने या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वमूमीवर शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन विक्रेता संघटनेकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना देत सोमवार, दि. 1 जूनपासून धान्य वाटप बंद करण्याचा इशाराही या संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. शहर भागातून येणार्या लोकांमुळे मोठ्या प्रमाणावर कोरोनाची बाधा होत असल्याचे दिसून आले आहे. गावोगावी मोठ्या प्रमाणावर शहरी भागासह परजिल्ह्यातून लोक येत आहेत. आता सर्वांनाच धान्य वितरण केले जात असून गावोगावी कोणता व्यक्ती कोठून आला आहे हे समजत नाही. त्यातच पूर्वीपेक्षा स्वस्त धान्य दुकानदारांचे काम आता तिपटीने वाढले आहे. त्यामुळेच कोरोनाचाही धोका वाढला आहे. त्यामुळेच शासनाने सर्व स्वस्त धान्य दुकानदारांची कोरोना चाचणी मोफत करावी, प्रत्येक दुकानदारास 50 लाखांचे विमा संरक्षण द्यावे, एन-95 मास्कसह फेस कव्हर, हातमोजे, सॅनिटायझर यासह अन्य सुविधा द्याव्यात अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत.
त्याचबरोबर अनेक लोक दुकानदारांशी धान्य वाटपावरून वाद घालतात. त्यामुळेच दुकानदारांना संरक्षण देत पोलीस अथवा होमगार्ड यांची नेमणूक होणे आवश्यक आहे तसेच धान्य वाटपप्रसंगी काही लोकांकडून दबाव टाकला जातो, तसे न केल्यास खोट्या तक्रारी करून त्रास दिला जातो. त्यामुळेच दुकानारांचे मनोधैर्य खचले असल्याचा दावाही निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. त्यामुळे सोमवार (दि. 1) पासून धान्य वाटप बंद करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.