
दैनिक स्थैर्य । दि. २९ जुलै २०२३ । मुंबई । पुसेगाव/नेर ता.खटाव, जि. सातारा येथील शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर ‘एमआयडीसी’चे शिक्के काढून टाकण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिली.
याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केली होती. मंत्री श्री. सामंत म्हणाले की, पुसेगाव/नेर ता.खटाव, जि. सातारा येथील शेतकऱ्यांचा ‘एमआयडीसीसाठी’च्या भूसंपादनास पूर्वीपासूनच विरोध असल्याने तसेच येथील शेतकऱ्यांनी वेळोवेळी याबाबत निवेदने दिली असून याठिकाणी शेतीसाठी पाणीपुरवठ्याची सोय करुन बागायती पिके केली असल्याने एमआयडीसीसाठीचे भूसंपादन रद्द करावे, यासाठी एमआयडीसीकडे निवेदने प्राप्त झाली आहेत. त्या अनुषंगाने याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिली.