राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे लोकमान्य टिळकांना अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि. २३ जुलै २०२२ । मुंबई । लोकमान्य टिळकांच्या १६६ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लोकमान्य टिळकांच्या गिरगाव चौपाटी मुंबई येथील स्मृती स्थळावर जाऊन टिळकांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यंदा स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे राज्यपालांनी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली तसेच स्मृतीस्थळाजवळच्या जागेत वृक्षारोपण केले.

लोकमान्य टिळक यांचे वृत्तपत्र बंद केले गेले. त्यांना भारतापासून हजारो मैल दूर मंडाले येथे तुरुंगवासात ठेवले गेले. तेथे त्यांनी ‘गीता रहस्य’ हा गीतेतील कर्मयोगावर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. गीता केवळ सन्यास वा भक्तीसाठी नाही, तर कर्माचा पुरस्कार करते असे सांगणारा टिळकांचा कर्मयोग अतुलनीय आहे. त्यातून अनेकांनी प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ हा स्वराज्याचा मंत्र देणारे टिळक हे पहिले नेते होते. महात्मा गांधींसह अनेक नेत्यांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यासाठी प्रदीर्घ लढा दिला व देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, असे सांगताना लोकमान्यांचे जीवन कार्य नव्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे असे राज्यपालांनी सांगितले.

कार्यक्रमाला लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष प्रकाश सिलम, समितीचे पदाधिकारी तसेच मुंबई महानगरपालिका व पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!