सरकारचा कांदा आयातीवर भर; नाशिक-राजस्थानच्या कांद्याला आव्हान अशक्य

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, नाशिक, दि.२: देशाला एरवी महिन्याला १२ ते १५ लाख टन कांद्याची आवश्‍यकता भासते. भाव वाढल्यावर होणाऱ्या घटीच्या अनुषंगाने महिन्याला आठ ते नऊ लाख टनांची मागणी राहते. सध्या मागणीच्या तुलनेत कमी उपलब्धता होत असल्याने कांद्याचा किलोचा भाव १०० रुपयांपर्यंत पोचला आहे. याच पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने कांद्याच्या आयातीवर भर दिला आहे. प्रत्यक्षात मात्र इजिप्त आणि तुर्कस्थानच्या कांद्याची चव देशातील ग्राहकांच्या जिभेवर रुळत नसल्याने सध्या बाजारात विकल्या जाणाऱ्या नाशिक आणि राजस्थानच्या कांद्याला भावाच्या बाबतीत आव्हान मिळण्याची शक्यता मावळली आहे. 

‘नाफेड’तर्फे आज आयातदारांची ऑनलाइन बैठक 


‘नाफेड’ने १५ हजार टन कांदा पुरवठ्यासाठी निविदा जारी केली आहे. पन्नास रुपये किलो भावाचा कांदा आयातदारांना २० नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध करून द्यायचा आहे. ४ नोव्हेंबरला निविदा बंद होणार असून, पाच नोव्हेंबरला निविदा उघडण्यात येणार आहे. त्यातंर्गत सोमवारी (ता.२) सकाळी अकराला ‘नाफेड’तर्फे आयातदारांची ऑनलाइन बैठक होत आहे. नाशिकचे निर्यातदार विकास सिंह यांनी ही माहिती ‘सकाळ’ला दिली. कोणत्याही देशातून मानवी आहारासाठी योग्य कांदा न्हावाशेवा, कांडला, तुतीकोरीन बंदरात पोचवण्याची अट निविदेत आहे. त्या कांद्याला सीमाशुल्क, भारतीय अन्नसुरक्षा व प्रमाणीकरण संस्थेच्या माध्यमातून मान्यता आवश्‍यक असेल. ‘नाफेड’ हा कांदा ट्रक आणि रेल्वेतून देशांतर्गत उपलब्ध करून देणार आहे. यापूर्वी मोठ्या आकाराच्या कांद्याला ग्राहकांकडून प्रतिसाद न मिळाल्याच्या अनुषंगाने ‘नाफेड’ला ४० ते ६० मिलिमीटर आकाराचा स्वच्छ, वाळवलेला व नुकसान न झालेला कांदा हवा आहे. एका आयातदाराला एक हजार टन कांदा उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. व्यापाऱ्यांनी आतापर्यंत सात हजार टन कांद्याची आयात केली आहे. दिवाळीपर्यंत व्यापाऱ्यांकडून २५ हजार टन कांदा देशात येणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मुळातच, देशाला ३० हजार टनापर्यंत कांदा लागत असल्याने त्याप्रमाणात आयात होणार नसल्याने राजस्थान आणि नाशिकचा कांदा ‘भाव’ खात राहणार ही पक्की खूणगाठ शेतकऱ्यांप्रमाणे व्यापाऱ्यांनी बांधली आहे. 

३८ रुपये किलो आयातीचा भाव 


आयातदारांना मिळालेल्या माहितीनुसार दुबईमध्ये तुर्कस्थान आणि इजिप्तचा कांदा ३८ रुपये किलोच्या आसपास भावाने मिळतो. हा कांदा ४५ रुपये किलोपर्यंत पोच होतो. पण १९९८ मध्ये इराण-इजिप्तहून आलेल्या कांद्याचा भाव किलोला ५० रुपये असतानाही आयातदारांना त्या व्यवहारात मोठा तोटा सहन करावा लागल्याचा अनुभव ‘नाफेड’चे माजी अध्यक्ष चांगदेव होळकर यांनी सांगितला. तसेच ‘नाफेड’ने देशांतर्गत बाजारपेठेत खरेदी केलेल्या कांद्यापैकी नुकसान झालेल्या कांद्याचे प्रमाण अधिक असल्याची बाब व्यापाऱ्यांपर्यंत पोचली आहे. सद्यःस्थितीत नाशिक, नगर, पुणे पट्ट्यात कांदा उपलब्ध आहे. देशाला महिनाभर पुरेल इतका कांदा शिल्लक असल्याचा दावा सरकारी यंत्रणा करत असली, तरीही जिल्ह्यात अडीच लाख टनाच्या आसपास कांदा शिल्लक राहिला असल्याचा अंदाज आहे. म्हणजेच काय, तर महिनाभर पुरेल इतका कांदा शिल्लक नाही.

पुढील महिन्यापर्यंत देशांतर्गत कांद्याचे भाव कमी होण्याची चिन्हे

सद्यःस्थितीत राजस्थानमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. त्यास ६० रुपये किलो असा भाव मिळत आहे. नाशिकचा कांदा ५० ते ६० रुपये किलो भावाने शेतकरी विकत आहेत. हाच कांदा देशांतर्गत ६० ते ७० रुपये किलो भावाने पोचत आहे. राजस्थानचा कांदा उत्तर भारतात दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, हरियानाच्या ग्राहकांसाठी, तर नाशिकचा कांदा दक्षिणेत कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्‍चिम बंगालच्या ग्राहकांसाठी पाठवला जाईल. सद्यःस्थितीत नवीन लाल कांद्याची किरकोळ स्वरूपात आवक सुरू आहे. लाल कांद्याची आवक वाढत असताना उन्हाळ कांद्याची आवक कमी होत जाईल आणि लाल कांदा ‘भाव’ खाण्यास सुरवात करेल, अशी स्थिती दिसते. म्हणजेच पुढील महिन्यापर्यंत देशांतर्गत कांद्याचे भाव कमी होण्याची चिन्हे नसल्याचे व्यापारी सांगताहेत. 

केंद्र सरकारने सद्यःपरिस्थितीत विनाकारण शेतकऱ्यांचा रोष ओढावून घेतला. कांद्याची आयात होणार असली, तरीही तो कोण खाणार? याचे उत्तर अद्याप मिळत नाही. देशांतर्गत परिस्थितीत आयात केलेल्या कांद्यापैकी निम्मा कांदा सडून गेला होता. त्यामुळे कांद्याचे भाव कमी होण्यासाठी डिसेंबरअखेरची वाट पाहावी लागणार आहे. -डॉ. सतीश भोंडे, शास्त्रज्ञ


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!