दैनिक स्थैर्य । दि. २० ऑक्टोबर २०२२ । मुंबई । राज्यातील मेंढपाळांच्या समस्यांबाबत राज्य शासन संवेदनशीलतेने विचार करत असून लवकरच पुन्हा बैठक घेवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मेंढपाळ बांधवांना आश्वस्त केले.
मेंढ्यासाठी चराई कुरण राखीव करणे व मेंढपाळांच्या अन्य समस्यांबाबत मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संजय गायकवाड, वन विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, वरिष्ठ अधिकारी व मेंढपाळ समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मेंढपाळांच्या समस्या जाणून घेत त्या सकारात्मक दृष्टीने सोडविण्याची तयारी दर्शविली. मेंढ्यासाठी चराई कुरण राखीव करण्याबाबत इतर राज्यांच्या धोरणांचा अभ्यास करण्याच्या सूचना सचिवांना दिल्या. समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या सूचना तसेच मेंढपाळांच्या मागण्यांचा सविस्तर आढावा घेवून त्यावरील उपाययोजना कराव्यात. मेंढीपालन व चराई कुरण राखीव करण्यासंदर्भात अस्तित्वातील कायद्यामधील तरतूदी, नियमांचा कायदेशीर अभ्यास करण्यासाठी विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेण्यात यावेत, अशा सूचना श्री. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
मेंढपाळांच्या मागण्यांसंदर्भात सचिवस्तरावर प्राथमिक बैठक घ्यावी. पुढील 20 दिवसानंतर पशुसंवर्धन, गृह आणि वन विभागाची पुन्हा संयुक्त बैठक घेवून शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.