कोकण लोककला महामंडळ स्थापन करण्यासाठी शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ फेब्रुवारी २०२३ । रत्नागिरी । कोकणात लोककलेची समृद्ध  परंपरा आहे. कोकणात पर्यटनाच्या अमर्याद संधी आहेत. यासाठीच कोकण क्षेत्र विकास प्राधिकरण  स्थापन करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या माध्यमातून संपूर्ण कोकणाचा कायापालट कालबद्ध रितीने होऊ शकतो. मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंत ग्रीनफिल्ड रस्ता  तयार झाल्यास पर्यटन वाढीस चालना मिळेल. कोकणातील लोककला वृद्धिंगत करण्यासाठी लोककला महामंडळ स्थापन करण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

चिपळूण येथील श्रीजुना कालभैरव मैदानावर ५ ते ८ फेबुवारीदरम्यान पर्यटन, लोककला, सांस्कृतिक, खाद्य महोत्सव रंगणार आहे.या महोत्सवाचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी कार्यक्रमस्थळी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, ज्येष्ठ साहित्यिक तथा संयोजन समिती अध्यक्ष तानाजी चोरगे, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे, आमदार शेखर निकम, आमदार प्रसाद लाड, आमदार योगेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी,  लोककलावंत प्रभाकर मोरे, ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत होऊन गेलेल्या रत्नांचे लोककला प्रदर्शनात लावलेल्या तैलचित्रांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या तैलचित्रांमध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या तैलचित्राचा समावेश करण्यात आला आहे.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, लोककला महोत्सवामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल,गेल्या सहा महिन्यांत या शासनाने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोकण भूमीतील गडकिल्ले,सागरी किनारे,निसर्गसंपन्न वातावरण हे कोकणचे वैभव आहे. मुंबई ते गोवा जुना महामार्गदेखील वेगाने तयार होत आहे.

कोकणची वैशिष्ट्ये अधोरेखित करणाऱ्या पर्यटन, लोककला, सांस्कृतिक आणि कोकणी खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्राला किंबहुना भारताला कोकणचा सर्वांगीण परिचय व्हावा, हा या महोत्सवामागचा मुख्य उद्देश आहे.  वाढत्या मोबाईल वापराने लोककला महोत्सवामुळे तरुण पिढी याकडे वळेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील विविध लोककला सादर होणार आहेत.

पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत तारपा, घोळनृत्य, दशावतार, चित्रकृती यांसह विविध कला एकत्र आणल्या जाणार आहेत. रोजची संध्याकाळ विविध लोककलांच्या दर्शनाने सुरू होणार आहे.

खाद्य महोत्सवांतर्गत विविध कोकणी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचे स्टॉल असतील. श्री जुना कालभैरव मंदिर अंतर्गत कै. बापू बाबाजी सागावकर मैदानावर उभारण्यात आलेल्या सह्याद्रीनगरात हा महोत्सव होणार आहे.

अशा महोत्सवांमुळे गोवा आणि केरळकडे असणारा पर्यटकांचा ओघ तितक्‍याच निसर्गसंपन्न आणि सांस्कृतिक संपन्नता असणाऱ्या आणि परंपरा जपणाऱ्या कोकणाकडे वळण्यास  मदत होईल. कोकणचे निसर्गसौंदर्य, खाद्यपदार्थ, सामाजिक,सांस्कृतिक परंपरा आणि मुख्यत: कोकणची लोककला ठळकपणाने जगासमोर यावी, अपरिचित कोकणची ओळख व्हावी आणि पर्यटकांचे पाय कोकणाकडे वळावेत, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये कोकणाच्या मातीतील अनेक अस्सल लोककला सादर केल्या जाणार आहेत. सिंधुदुर्गातील दशावतार/चित्रकथी, रत्नागिरी जिल्ह्यातील नमन, जाखडी, काटखेळ, गजो, संकासूर रायगड जिल्ह्यातील कोळी नृत्य, ठाणे जिल्ह्यातील तारपा नृत्य अशा ४० पेक्षा अधिक लोककला त्यांच्या मूळ रूपात सादर केल्या जाणार आहेत. दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत लोककलांचे सादरीकरण होणार आहे. दररोज सायंकाळी साडेचार ते सहा या वेळेत खुला लोककला कट्टा स्थानिक कलाकारांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय संदर्भपूर्ण माहिती देणारे परिसंवाद दिवसभरात होणार आहेत. कोकणी पदार्थांच्या वैशिष्ट्यपूर्ण चवींचे ३० पेक्षा अधिक स्टॉल्स असणारी खाऊगल्ली ही चोखंदळ खवैय्यांसाठी पर्वणी असणार आहे. हा सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे.


Back to top button
Don`t copy text!