मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन सकारात्मक – सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि ३१ : मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासनस्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर “भारतरत्न पुरस्कार” मिळावा यासाठी केंद्र सरकारला राज्य शासनाच्या वतीने शिफारस करण्यात येईल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले.

मातंग समाजाच्या विविध प्रश्नांबाबत आज सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात बैठक झाली. डॉ. कदम म्हणाले की, राज्यातील मातंग समाजाच्या विविध मागण्या लक्षात घेऊन शासनस्तरावरुन सकारात्मक दृष्टीकोनातून मार्ग काढण्यात येईल. क्रांतीवीर लहुजी साळवे स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळअंतर्गत थेट कर्ज योजना तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबविणे, अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देणे, तसेच वाळवा तालुक्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव असलेले वाटेगाव येथील स्मारकाच्या विकासावर भर देण्यात येईल, आदी प्रमुख मुद्यावर यावेळी चर्चा करण्यात आली.

या बैठकीस साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक  अ.को.अहिरे, अवर सचिव श्री.सिध्दार्थ झाल्टे, समाजकल्याण निरीक्षक देवराम मेश्राम आदीसह सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मातंग समाजाचे प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी- अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष  विजय अंभोरे,  मनोज कांबळे,  सुरेश पाटोळे,  ज्ञानेश्वर काळे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!