सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी – कृषिमंत्री धनंजय मुंडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २४ जुलै २०२३ । बीड । कमी पावसात दमट हवामानामुळे गोगलगायीची समस्या निर्माण झाली आहे यामुळे बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, याचे लवकरात लवकर पंचनामे करावे व नियमानुसार पुढील प्रक्रिया करावी, असे निर्देश देत शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज परळी येथे केले.

कृषिमंत्री मुंडे यांनी आज परळी तालुक्यातील वाघबेट आणि वेळब गावात प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली व शेतकऱ्यांची संवाद साधला यावेळी बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या समवेत पाहणीस हजर होत्या.

याबाबतच्या उपाययोजना कशाप्रकारे करता येतील आणि नुकसान झालेल्या भागातील पंचनामे लवकर होतील या संदर्भात कृषीमंत्री यांनी दूरध्वनीद्वारे मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्याशी संपर्क साधला व त्या स्वरूपाचे प्रस्ताव आजच कृषी विभागाने तयार करून मंत्रालयास पाठवावे असे निर्देश स्थानिक अधिकाऱ्यांना दिले.

याआधी देखील बीड जिल्ह्याचा काही भाग तसेच उस्मानाबाद आणि नांदेडमध्ये अशा प्रकारचा गोगलगायींचा प्रादूर्भाव झाला होता त्यावेळी शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून त्यांना शासन स्तरावरून मदत करण्यात आली होती त्याच पद्धतीने याबाबतीत काम करावे लागेल असे श्री. मुंडे म्हणाले.

शेतकऱ्यांना या संकटाचा मुकाबला करण्यासाठी तातडीने स्थानिक स्तरावर औषधी खरेदी करण्यासंदर्भात यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. नियोजन निधी मधील कृषी विभागाच्या रकमेतून ही खरेदी शक्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित दिलासा मिळण्याच्या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांनी काम करावे असे कृषिमंत्री यावेळी म्हणाले.

…तर कारवाई करू

पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडून ज्यादा पैसे घेतले जात आहेत अशा स्वरूपाची लिखित तक्रार आल्यास त्या संदर्भात निश्चितपणे कार्यवाही करून व दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल असे कृषिमंत्र्यांनी पत्रकारांशी यावेळी बोलताना सांगितले.

यंदा पावसाने ओढ दिली आणि पावसाला विलंब झालेला आहे तसेच मागील वर्षाच्या तुलने पावसाचे प्रमाण अत्यल्प असे आहे, मात्र 25 तारखेला नंतर त्यात फरक पडेल अशी शक्यता असल्याने येणाऱ्या काळात पाऊस सुरू होईल असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात यावेळी सांगितले.

या दौऱ्यात कृषी विभागाचे तसेच महसूल विभागाचे अधिकारी सामील झाले होते.

आज दौऱ्याला प्रारंभ करण्यापूर्वी कृषिमंत्री मुंडे यांनी येथील ज्योतिर्लिंग वैद्यनाथाचे दर्शन घेतले.

संवेदनशील कृषी मंत्री

बीड जिल्ह्यात झालेला कमी पाऊस आणि शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच नुकत्याच घडलेल्या इर्शाळगड येथील दुर्घटनेमुळे सर्वांचे स्वागत नाकारत स्वागत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आपली संवेदनशीलता दाखवून दिली.


Back to top button
Don`t copy text!