गौराई माझी लाडाची…
काल गौराई घरी आली. माहेरवाशिणीची लाडकी गौराई जेष्ठा नक्षत्राच्या मुहूर्तावर घरी आली. आपल्या लाडक्या गणेशाला पृथ्वी भूमीवर भेटण्यासाठी आली. माहेरपण अनुभवायला आली. आजी, आई, वहिनी तिची हौस-मौज पूरवू लागल्या. वर्षभर भक्तांचे रक्षण करून थकल्या, भागलेल्या गौराईची उठ-बस करू लागल्या. तिच्या आवडीची पुरणपोळी, सोळा भाज्यांची एकत्र मिश्र भाजी, ज्वारीच्या पीठाची अंबिल. तिला जे जे आवडते ते सगळे करून करून वाढले जातात. तिची आवड लक्षात घेऊन पदार्थ केले जातात. वहिनी तिची खणा-नारळाने ओटी भरते. तिला साडीचोळी देते. ही गौराई आपल्या माहेरी फक्त तीनच दिवस येते आणि आपल्या लाडक्या गणेशाबरोबर सासरी परतते. तिच्यासाठी दिवाळीचा फराळ मुद्दाम केला जातो. रव्याचे लाडू, चकली, करंजी, बेसन लाडू, गुळ पापडीचा लाडू केला जातो. तिच्या मुखे सवाष्ण जेऊ घातली जाते. सर्व सणांची तिची राहिलेली हौस-मौज पुरवली जाते. दिवाळीचा फराळ, होळीची पुरणपोळी, सर्व फळभाज्या तिला करून वाढल्या जातात. ती वर्षभराने येते आणि आपल्या हक्काच्या आपल्या स्वत:च्या घरी येऊन रहाते. लेकी सुना, काकी-मावशी, आई, आजी ह्यांना पुण्य अर्पण करते. आता उद्या मूळ नक्षत्रावर ती आपल्या घरी निघेल आणि तिच्या माहेरचे तिला डोळ्यातल्या अश्रूंनी आणि चेहरे हसरे ठेवून तिचा निरोप घेतील. त्यांची गौराई वर्षभराच्या विरहासाठी विश्वकल्याणासाठी आता निघेल. जाताना लाख लाख आशिर्वाद देऊन जाईल आणि पुण्यसंचय करून देईल सर्वांची लाडकी गौराई.
– केदार अनंत साखरदांडे