दैनिक स्थैर्य । दि. १३ मे २०२२ । मुंबई । मेघालयमधील लोकप्रतिनिधींना महाराष्ट्रातील संस्कृती आणि परंपरा जाणून घ्यायला आवडेल, त्यांची महाराष्ट्र राज्य भेट भविष्यात नियोजित करू असे सांगून, मेघालय विधानसभेचे अध्यक्ष मेतबाह लिंगडोह यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामकाजाची प्रशंसा केली.
आज विधिमंडळात मेघालय विधानसभेचे अध्यक्ष मेतबाह लिंगडोह यांनी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मेतबाह लिंगडोह यांना आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट देण्यात आली. श्री. लिंगडोह यांनी विधानसभा सभागृहाची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी विधानपरिषद सदस्य अभिजीत वंजारी, विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, मुंबईतील मेघालय हाऊस राजशिष्टाचार अधिकारी श्री. फ्रँकलिन, डावस शाबाँग यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
सभापती श्री.रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याबरोबर मेघालय विधानसभा अध्यक्ष मेतबाह यांनी महाराष्ट्र विधिमंडळाची पद्धती, राज्याची संस्कृती, भौगोलिक परिस्थिती, हवामान, राजकारण, राजकीय पक्ष आणि त्यांचा शासनातील सहभाग याबाबत माहिती जाणून घेतली. राज्यातील विधिमंडळाचे कामकाज आणि मेघालयमधील विधानसभेच्या कामकाजाची पद्धत याबाबत चर्चा करण्यात आली. भारतातील सर्व राज्यातील विधिमंडळातील कामकाजात नेवा सॉफ्टवेअरद्वारे ‘ई – विधान’ ही प्रणाली राबविण्यात येणार आहे, त्याबद्दलही त्यांनी कुतूहल व्यक्त केले. श्री. लिंगडोह यांनी विधानपरिषद सभापती, विधानसभा उपाध्यक्ष आणि उपसभापती, विधिमंडळाचे सचिव यांना मेघालय भेटीचे निमंत्रण दिले.