स्थैर्य, फलटण दि.२: स्थैर्य, फलटण दि. २ : गेल्या दोन दिवसांपासून फलटण तालुक्यात चर्चेचा विषय बनलेल्या तहसील कार्यालयातील चोरी प्रकरणी फलटण पोलिसांना चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.
फलटण येथील तहसिल कार्यालय फोडून तेथून २ लाख ७०० रुपये किंमतीचे संगणक व अन्य साहित्य चोरुन नेल्याच्या घटनेतील १ लाख ३५ हजार रुपये किंमतीचे काही संगणक व अन्य ऐवज फलटण जिनिंगच्या परिसरातील बंद इंजिन रुममध्ये बांधलेल्या पोत्यांमध्ये मिळून आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुधोजी महाविद्यालयालगत असलेल्या फलटण जिनिंगच्या परिसरातील बंद इंजिन रुममध्ये काल दि.१ रोजी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास एक मुलगा गेला असता त्यास तेथे काही पोती बांधून ठेवल्याचे दिसले. त्याने हा प्रकार घरी सांगितला असता त्याची माहिती पोलीसांना कळविण्यात आली. सदर माहिती मिळताच फलटण शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तेथे गेले असता त्यांनी पाहिले असता त्या पोत्यांमध्ये मॉनिटर, संगणक, सिपीयू असा एक लाख ३५ हजार रुपये किंमतीचा ऐवज मिळून आला व तो तहसिल कार्यालयातील असल्याचे त्यावर लिहिलेले असल्याने समोर आले. तहसिल कार्यालयातील अधिकार्यांनी पाहणी केली असता सदर ऐवज हा येथील तहसिल कार्यालयातीलच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सदर ऐवज जप्त करण्यात आला असून पुढिल तपास सपोनि एन आर गायकवाड हे करीत आहेत.