गोंदवलेकर महाराज दिंडीचे एक जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान


दैनिक स्थैर्य । 30 जून 2025 । सातारा । श्री ब्रह्मचैतन्यमहाराज गोंदवलेकर यांची पायी दिंडी एक जुलैला सकाळी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

आषाढीवारीसाठी ’श्रीं’च्या पायी दिंडीची परंपरा आहे. या पायी दिंडीमध्ये श्री गोंदवलेकर महाराजांचे भक्तगण सहभागी होतात. यंदा येत्या एक जुलैला सकाळी साडेआठ वाजता ही दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यानिमित्ताने समाधी मंदिरात विधिपूर्वक पूजन झाल्यावर ’श्रीं’ची प्रतिमा व पादुका रथामध्ये, विराजमान करण्यात येतील. त्यानंतर ही दिंडी ग्रामप्रदक्षिणेसाठी निघेल.गावातील थोरले श्रीराम मंदिरात आरती व भजन होऊन दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. दिंडीचा पहिला मुक्काम म्हसवडला होणार असून, पिलीव, भाळवणी येथील मुक्कामानंतर दिंडी चार जुलैला पंढरपूरमधील इसबवी येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर मठात पोचेल. सात जुलैला ही दिंडी परतीच्या प्रवासाला निघेल,

दरम्यान, आषाढीवारीसाठी निघालेल्या गावोगावच्या अनेक पायी दिंड्या गोंदवले येथूनच पुढे जातात. या दिंड्यांचा मुक्कामदेखील येथे होतो. त्यामुळे गावातील अनेक दानशूरांकडून अन्नदानाची परंपरा राखली जाते. माउलींच्या दिंडीतील वारकरी देखील ’श्रीं’च्या समाधी दर्शनासाठी येतात. त्यामुळे गोंदवल्यात भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. या दिंड्यांच्या व भाविकांच्या स्वागतासाठी गोंदवलेनगरी सज्ज झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!