
स्थैर्य, फलटण, दि. 31 ऑगस्ट : मराठा समाजातील आणि इतर आर्थिकदृष्ट्या मागास घटकांतील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उद्योजक बनण्यास प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजना महत्त्वपूर्ण ठरत आहेत. या योजनांच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यातील एक लाख मराठा तरुण उद्योजक बनले असून, फलटण तालुक्यातील तरुणांनीही याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे.
महामंडळाचे कामकाज पूर्णपणे ऑनलाईन आणि पारदर्शक असून, इच्छुक तरुण www.udyog.mahaswayam.gov.in
या संकेतस्थळावर थेट अर्ज करू शकतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांच्या आत असावे आणि कमाल वयोमर्यादा ६० वर्षे आहे.
महामंडळाच्या प्रमुख योजना:
- वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना: या योजनेअंतर्गत, उद्योगासाठी बँकेकडून घेतलेल्या १५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील १२ टक्के व्याज दराने, ७ वर्षांपर्यंतचा व्याज परतावा महामंडळामार्फत थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा केला जातो.
- गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना: दोन किंवा अधिक व्यक्तींच्या गटासाठी ही योजना असून, यामध्ये ५० लाख रुपयांपर्यंतच्या गट कर्जावरील १२ टक्के व्याजदराने, ५ वर्षांपर्यंतचा व्याज परतावा महामंडळ देते. यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPO) सुद्धा लाभ घेता येतो.
चांगला सिबिल स्कोअर आवश्यक या योजनांसाठी बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य असल्याने, अर्जदाराचा सिबिल स्कोअर (CIBIL Score) चांगला असणे आवश्यक आहे. ७५० पेक्षा अधिक सिबिल स्कोअर असल्यास कर्ज मिळणे सुलभ होते. त्यामुळे कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे आणि आर्थिक व्यवहार स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे.
या योजनेअंतर्गत, लाभार्थ्याने प्रथम महामंडळाच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करून पात्रता प्रमाणपत्र (LOI) घ्यावे, त्यानंतर बँकेत कर्जासाठी अर्ज करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर आणि लाभार्थ्याने हप्ता भरल्यानंतर, त्यातील व्याजाची रक्कम महामंडळामार्फत परत केली जाते. अधिक माहितीसाठी जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधता येईल.