स्थैर्य, दि. ०३: लग्नसराईचा हंगाम सुरू होताच लोकांना मोठी भेट मिळाली आहे. सोने सतत स्वस्त होत आहे. गेल्या ७ महिन्यांत सोन्याचा भाव १०,८८७ रुपयांनी कमी झाला आहे. या वर्षी एक जानेवारीपासून आतापर्यंत सराफा बाजारात सोने (२४ कॅरेट) ४,९६३ रुपयांनी (९.८९%) स्वस्त झाले. मंगळवारी हा भाव ४५,२३९ रुपये प्रति दहा ग्रॅम होता, तो ३१ डिसेंबर २०२० ला ५०,२०२ रुपये होता. या वर्षी आतापर्यंत दागिन्यांसाठीचे सोनेही ४५,९१३ रुपयांवरून ४१,४३९ रुपये प्रति दहा ग्रॅम झाले.
सोन्याचा भाव उतरण्यामागचे सर्वात मोठे कारण अमेरिकेत बाँड यील्ड वाढणे हे आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात ऑगस्टपासून आतापर्यंत सुमारे १७ टक्के घट झाली आहे. सुमारे सात महिन्यांपूर्वी ७ ऑगस्टला सोन्याचा भाव ५६,१२६ रुपये प्रति दहा ग्रॅम या विक्रमी उच्च स्तरावर होता. तेव्हापासून आतापर्यंत सोने १०,८८७ रुपयांनी स्वस्त झाले आहे म्हणजे त्यात १९.४० टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. याचा अर्थ असा की, ज्या लोकांनी सोन्याची खरेदी आतापर्यंत टाळली होती त्यांच्यासाठी ही खरेदीची चांगली संधी आहे. तज्ज्ञांच्या मते, निकटच्या भविष्यात भाव वाढण्यास सुरुवात होईल.
खरेदीची ही सुवर्णसंधी : इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे (आयबीजेए) राष्ट्रीय अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांनी सांगितले की, देशांतर्गत बाजारात सोन्याची जोरदार मागणी कायम आहे. लग्नसराई सुरू आहे आणि भाव खूप उतरले आहेत. त्यामुळे मागणीचा दबाव आणखी वाढेल. या अर्थाने दरांतील घसरण शॉर्ट टर्म आहे. सोने लवकरच बाउन्स बॅक करेल. त्यामुळे सोन्याचे दागिने खरेदी करण्याची ही सर्वात सुवर्णसंधी आहे.
४४,५०० रुपयांवर सोन्याला मजबूत पाठिंबा
केडिया अॅडव्हायझरीचे एमडी अजय केडिया म्हणाले की, सोन्याला ४४,५०० ते ४५,००० रुपयांदरम्यान सपोर्ट आहे. त्याचा अर्थ असा आहे की, त्याचे दर ४५ हजार रुपयांपेक्षा खूप खाली येण्याची शक्यता नाही.
या कारणांमुळे कमी झाला भारतात सोन्याचा भाव
– बाँड यील्ड घटल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यावर दबाव वाढला.
– कोविड लसीकरण वाढल्याने गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी घटली
– अमेरिकेत १.९ लाख कोटी डॉलरच्या पॅकेजमुळे डॉलर मजबूत होणे.
– सोन्यावरील आयात शुल्क १२.५% नी घटवून १०.५% केले जाणे.