पैठण ते नांदेडपर्यंत गोदाकाठ जलमय : 14 वर्षांनंतर जायकवाडीची आपत्कालीन दारे उघडली, एक लाख क्युसेकने गोदावरी पात्रात विसर्ग, नदीवरील सर्वच छोटे-मोठे बंधारे तुडुंब


 

स्थैर्य, दि.१९: मराठवाड्यात गाेदावरी नदीवरील सर्वच प्रकल्प तुडूंब भरले असल्याने गोदापात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पैठण ते नांदेडपर्यंत गोदावरीचा काठ जलमय झाला आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि वरच्या प्रकल्पांतून सोडलेल्या पाण्यामुळे संपूर्ण जिल्हाच जलमय झाला आहे. गोदावरी, मानार, पैनगंगा, कयाधू, लाखाडी, सीता नदीला पूर आल्याने अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले. गोदावरी नदीवरील विष्णुपुरी, बळेगाव, आमदुरा आणि बाभळी बंधाऱ्याचे अनेक दरवाजे उघडण्यात आले. सीता नदीला पूर आल्याने दुपारी काही काळ नांदेड-मुदखेड मार्ग बंद झाला होता.

गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विष्णुपुरी बंधाऱ्याचे सहा दरवाजे उघडून ८४५४१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बळेगाव बंधाऱ्याचे १४, आमदुरा बंधाऱ्याचे १४ तर बाभळी बंधाऱ्याचे सर्वच्या सर्व १८ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. दरम्यान पाणी वाढलं तर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी संबंधित विभागाची तातडीने बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्ह्यात नांदेड शहरासह मुदखेड, धर्माबाद या तालुक्यांतून गोदावरी नदी वाहते. बिलोली आणि नायगाव तालुक्यातील काही गावे प्रभावित होऊ शकतात. गोदावरी नदीकाठच्या जवळपास ३३७ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली. नदीकाठी तसेच शहरातील नदी घाटावर जीवरक्षक दल तैनात करण्यात आले. सध्या जायकवाडी, माजलगाव, मासोळी मध्यम प्रकल्प आणि सिद्धेश्वर या धरणातून गोदावरी नदीत विसर्ग सुरू आहे. रात्रीपर्यंत हा विसर्ग १ लाख ४८ हजार क्युसेकपर्यंत वाढेल. तितक्याच वेगाने विष्णुपुरीतून पुढे विसर्ग केला जाईल. पण पुढे तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरण देखील १०० टक्केही भरले आहे. त्यातूनही विसर्ग सुरू आहे. पोचमपाडच्या बॅक वाॅटरचा सर्वाधिक धोका नांदेड जिल्ह्याला बसण्याची शक्यता असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

जालना जिल्ह्यात बंधारे फुल्ल

जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रात विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. अंबड, घनसावंगी आणि परतूर तालुक्यात या नदीवर मोठ्या क्षमतेचे बंधारे बांधण्यात आलेले आहेत. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे आधीच बंधारे फुल्ल झालेले आहेत. त्यात आता जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदी पात्र काठोकाठ भरले आहे. त्यामुळे शहागड, पाथरवाला, जोगलादेवी, मंगरूळ, राजाटाकळी या बंधाऱ्यावरील सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या नदीला पूर नाही. परंतु परिस्थिती नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज असून गावागावांत दवंडी दिली आहे. बंधाऱ्यांजवळ कुणालाही जाण्यास मनाई करण्यात आली आहे. अंबड आणि घनसावंगीच्या तहसीलदारांनी बंधाऱ्याला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

१४ वर्षांनंतर जायकवाडीची आपत्कालीन दारे उघडली

सलग दुसऱ्या वर्षी नाथसागर तथा जायकवाडी जलाशय १०० टक्के भरले आहे. धरणात गुरुवारी रात्री आवक वाढल्याने शुक्रवारी सर्व २७ दरवाजे उघडून सुमारे एक लाख क्युसेक वेगाने गाेदापात्रा पाणी साेडले जात आहे. तब्बल १४ वर्षांनंतर आपत्कालीनसह सर्व दरवाजे उघडून गाेदावरी नदीत विसर्ग सुरू आहे. पाण्याची आवक गुरुवारी रात्री वाढत गेल्याने रात्रीच धरणातून नदी पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली.

तीन दिवसांपूर्वीच आवक कमी झाल्याने १८ दरवाजे बंद करून चारच दरवाज्यांमधून विसर्ग करण्यात येत होता. मात्र, गुरुवारी रात्री अचानक धरणात दाखल होणारे पाणी वाढल्याने मध्यरात्रीच सर्व दरवाजे उघडण्यात आले. २००६ मध्ये एक लाख ५४ हजार क्युसेक वेगाने पाणी सर्व दरवाजांमधून सोडले जात होते. त्यानंतर यंदा एक लाख क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडले जात असल्याचे अभियंता संदीप राठोड, भूषण दाभाडे, ए. ए. सबनीस यांनी सांगितले. मागील वर्षी धरण शंभर टक्के भरल्याने विसर्ग केला होता. मात्र तेव्हा आपत्कालीन दरवाजे उघडण्यात आले नव्हते.

पूरपरिस्थिती मात्र नियंत्रणात

गोदावरीचे नदीपात्र भरून दुथडी भरून वाहत आहे. मात्र नदीपात्रातील वहन क्षमता व गोदावरीवरील आपेगाव, हिरडपुरी या दोन्ही बंधाऱ्यांचे गेट उघडले असल्याने सध्या पूरपरिस्थिती असली तरी ती नियंत्रणात असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी सांगितले.

परभणी जिल्ह्यात अलर्ट, ‘माजलगाव’मधूनही विसर्ग

जायकवाडी पाठोपाठ माजलगाव प्रकल्पातून शुक्रवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीतील पाणी पातळीत मोठी वाढ होऊन गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. जायकवाडी प्रकल्पात पाण्याची आवक ओळखून नदीपात्रात ७५ हजार क्युसेक किंवा त्याहूनही अधिक पाणी सोडण्याची शक्यता आहे. जायकवाडीचे पाणी गोदावरी पात्रात मोठ्या वेगाने झेपावले आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील ढालेगाव, मुदगल तारुगव्हाण हे बंधारे यापूर्वीच पावसाने तुडुंब भरले आहेत. या पार्श्वभूमीवर या बंधाऱ्यातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

दक्षतेच्या सूचना :

गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा धोका आहे. पूरपरिस्थिती निर्माण होईल, अशी शक्यता गंगाखेडचे तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी व्यक्त केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!