वैभवशाली मुंबई विद्यापीठाने आपली ख्याती अधिक वाढवावी – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ डिसेंबर २०२१ । मुंबई । आज देशातील आयआयटी संस्थांनी सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये स्थान पटकावले आहे. मुंबई विद्यापीठाला अलिकडेच ‘नॅक’कडून ए प्लस प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान असणाऱ्या वैभवशाली मुंबई विद्यापीठाची ख्याती जगभर अधिक वाढावी यासाठी विद्यापीठाने पावले टाकावीत, अशी अपेक्षा राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.

राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठाचा २०२१ या वर्षाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ सोमवारी (दि. २७) विद्यापीठाच्या फोर्ट येथील सर कावसजी जहांगीर सभागृहात झाला त्यावेळी ते बोलत होते.

दीक्षांत समारंभाला पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, गोवा येथील राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेचे संचालक प्रा. सुनील कुमार सिंह, कुलगुरू सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, संचालक परीक्षा व मूल्यांकन डॉ विनोद पाटील, कुलसचिव डॉ सुधीर पुराणिक, विविध शाखांचे अधिष्ठाता, विद्यापीठाच्या प्राधिकार मंडळांचे सदस्य, शिक्षक व स्नातक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी डोळ्यांसमोर मोठे लक्ष्य ठेवून त्याच्या प्राप्तीसाठी परिश्रम करून विलक्षण असे काही प्राप्त केले तर भारताला जगद्गुरू होता येईल असे सांगताना विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरीच्या संधी निर्माण करणारे उद्योजक व्हावे, असे राज्यपालांनी सांगितले. देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रत्येक स्नातकाला आत्मनिर्भर व्हावे लागेल असे त्यांनी सांगितले.

नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आंतरशाखीय अध्ययन व ॲकॅडेमिक क्रेडिट्स देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना विविध शाखांमधील विषय देखील शिकता येणार आहे असे राज्यपालांनी सांगितले. मुलींचा उच्च शिक्षणातील टक्का वाढत असल्याबद्दल तसेच सुवर्णपदके अधिकांश मुलींनी प्राप्त केल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.   दीक्षांत समारंभात विविध शाखांमधील एकुण २,१२,५७९ स्नातकांना पदव्या, २४३  स्नातकांना पीएचडी तसेच सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!