
स्थैर्य, दि.७ : सोने आणि चांदीच्या दरात वृद्धी झाल्याचे दिसून आले. दहा ग्रॅम सोने ३०० रुपये तर चांदीमध्ये प्रति किलो १००० रुपये वाढ झाली आहे. सोने ५२ हजार ३०० तर चांदीने ७१ हजारांचा स्तर गाठला आहे.
अमेरिकन अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी मोठ्या आर्थिक पॅकेजची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच डॉलरचे मूल्य घसरत आहे. ब्रिटनसह इतर देशांमध्ये नव्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने नकारात्मकता वाढली आहे. ब्रिटनमध्ये टाळेबंदी केल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांची पसंती ठरत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
सोने-चांदीच्या व्यवहारात सट्टा बाजार तेजी आल्याने या दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव प्रमाणात वाढले आहे. चांदीने ७० हजारांचा टप्पा ओलांडून ७१ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे अमेरिकन डॉलरचे दर कमी झाले तरी दोन्ही धातूंचे भाव वाढले आहेत. या भाववाढीमुळे सुवर्ण व्यावसायिकही चिंतेत आहेत.
जुलै महिन्यापासून सोने-चांदीचे भाव वाढतच जाऊन नवनवे विक्रम गाठले गेले. अमेरिकन डॉलरचे दर वाढल्यास सोने-चांदीचेही दर वाढतात. मात्र, बुधवारी ३८ पैशांनी डॉलरचे दर घसरून ते ७४.९० रुपयांवर आले तरी सोने-चांदीचे भाव वाढले. सट्टाबाजार तेजीत आल्याने ही भाववाढ झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे सोने-चांदीतील भाववाढीने सुवर्ण व्यावसायिकही चिंतित झाले आहेत. सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने एवढी रक्कम कशी उभी करावी, अशी चिंताही सुवर्ण व्यावसायिकांना सतावत आहे.
सुरक्षित गुंतवणूक म्हणून पसंती
कोरोनाच्या संकटामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याचा फायदा घेत दलालही सक्रिय होऊन सट्टा बाजार तेजीत आला आहे. त्यामुळे सोने-चांदीत अचानक वाढ तर कधी घसरण होत आहे. काही दिवसांपासून भाव तेजीच येत असल्याचे चित्र आहे.