स्थैर्य, नांदेड दि. ८ : आध्यात्मिक उत्साहाला प्रतिबिंबीत करणारा उत्सव म्हणून गणेशोत्सवाकडे आपण पाहत जरी असलो, तरी यावर्षी कोविड – १९ या संसर्गजन्य प्रादूर्भावामुळे प्रत्येक नागरिकांनी स्वयंशिस्तीला अधिक प्राधान्य देण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. शुक्रवार ७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक गणेश मंडळ पुर्वनियोजन आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रत्येक नागरिकांचे जबाबदार वर्तन अपेक्षित आहे. सार्वजनिक पातळीवर लोकसहभागातून लोकांच्या इच्छेनुसार जी काही वर्गणी गोळा होईल त्यातील वर्गणीचा काही भाग हा वैद्यकीय उपकरणांसाठी रुग्णालयांना दिल्यास ती खऱ्या अर्थाने विवेकाचे प्रतिक ठरेल असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील गणेश मंडळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत साधेपणावर भर देऊन शासनाने आखून दिलेल्या नियम व अटीच्या चौकटीत हा उत्सव साजरा करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी या गणेशोत्वासाठी खालील अटी व शर्ती निश्चित केल्या आहेत.
सार्वजनिक गणेश मंडळे
सार्वजनिक गणेश मंडळांना प्रतीवर्षी प्रमाणे स्थानिक प्रशासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल. (महानगरपालिका, पोलीस प्रशासन)
मोठे मंडप टाळुन मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारावेत. श्री गणेशाची मूर्ती ४ फुट उंचीच्या मर्यादेतच असावी.
सजावट साधी असावी त्यात भपकेबाजी नसावी. तसेच बंदी असलेले प्लास्टीक व थर्माकोलचा वापर करु नये.
आरोग्य विषयक व सामाजिक हिताच्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी.
उत्सवाकरिता वर्गणी / देणगी स्वच्छेने दिल्यास स्वीकार करावा.
सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्यविषयक उपक्रम उदा. रक्तदान शिबीर, कोरोना, डेंग्यु, मलेरिया इ. आजार व त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी.
आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणासंबंधीच्या नियमांचे पालन करावे.
श्री गणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबलनेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इ. व्दारे उपलब्ध करुन देण्यावर भर दयावा.
मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.
दर्शनार्थी भाविक मास्क, सॅनिटायझर वापरतील तसेच पुरेसे शारीरिक अंतर राखतील यावर विशेष लक्ष दयावे.
श्रीं चे आगमन व विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यास शासनाची परवानगी नाही.
विसर्जन स्थळी होणारी आरती मंडपातच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे.
शक्य झाल्यास यावर्षी श्रींच्या मूर्तींचे विसर्जन न करता पुढील वर्षी करावे. लहान मुले व ज्येष्ठ नागरीकांनी विसर्जन स्थळी जाणे टाळावे.
मंडळांनी प्रतिवर्षी वापरता येतील अशा धातुच्या मूर्ती वापरण्यावर भर दयावा.
सांस्कृतिक कार्यक्रमांना गर्दी होते त्यामुळे कोविड – १९ साथरोगाचा प्रसार होण्यास मदत होते त्यामुळे असे कार्यक्रम टाळून वाचणाऱ्या निधीतुन कोविड – १९ प्रतिबंधासाठी (व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलेंडर, बेड्स) इ. वस्तु स्वरुपात महानगरपालिका / शासकीय रुग्णालयास दयावे.
मंडळांनी त्यांचे परिसरातील खुल्या जागांवर मियावाकी पद्धतीने घनवन निर्मीती करण्यासाठी वृक्षारोपण करावे.
चालु वर्षी कोरोनाचे संकट लक्षात घेता सार्वजनिक मंडळांनी यावर्षी उत्सव शक्यतो टाळावा अथवा एक गाव एक गणपती किंवा चार पाच शेजारच्या कॉलनी/नगरे यांनी मिळुन एके ठिकाणी गणेश उत्सव साजरा करावा.
मूर्ती विसर्जनाकरिता महानगरपालिकेतर्फे विविध ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात येतील त्यांचा वापर करावा.
घरगुती गणेशोत्सव
घरगुती श्री गणेशाची मूर्ती 2 फुट उंचीच्या मर्यादेतच असावी.
शक्यतो धातु अथवा संगमरवर अशा मुर्तींचे पुजन करावे.
मूर्ती शाडु मातीची पर्यावरण पुरक असल्यास तिचे विसर्जन घरच्या घरी करावे.
ते शक्य नसल्यास महानगरपालिकेतर्फे झोन निहाय निर्माण केल्या जाणाऱ्या ‘मूर्ती स्विकार केंद्रांवर’ मूर्ती नेऊन देण्यात यावी. त्यांचे विसर्जन महानगरपालिका व सेवाभावी संस्थेमार्फत करण्यात येईल.
मूर्ती खरेदी करिता होणाऱ्या गर्दीमुळे कोविड – १९ साथरोगाचा प्रसार होण्यास मदत होते हे लक्षात घेता योग्य शारीरिक अंतर राखुन खरेदी करावी.
या वर्षी हरीत गणेश संकल्पनेवर भर द्यावा. घरच्या घरी पर्यावरण पुरक मूर्ती बनवून पूजन करावे, यातुन पालकांच्या व मुलांच्या कलात्मकतेला देखील वाव मिळेल.
अशा प्रकारे ‘मूर्ती स्विकार केंद्रात’ मूर्ती आणून देणाऱ्या नागरिकांना जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व महानगरपालिका आयुक्त यांच्या स्वाक्षरीने ‘पर्यावरण मित्र’ प्रमाणपत्र दिले जाईल.
विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे.
मूर्ती विसर्जनाकरिता महानगरपालिकेतर्फे विविध ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात येतील त्यांचा वापर करावा.