दुर्गम बामणोली विभागात आरोग्य सुविधा प्राधान्याने द्या : आ. शिवेंद्रसिंहराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना केल्या सूचना 

स्थैर्य, सातारा, दि. 07 : कोरोना महामारीच्या अटकावासाठी डोंगराळ आणि दुर्गम असलेल्या बामणोली विभागात आरोग्याच्या प्राधान्याने देणे आवश्यक आहे. याबात जिल्हा आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांना केल्या.

जावली तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ बामणोली विभागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, ग्रामस्थांना आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. अर्चना रांजणे, माजी सदस्य राजू भोसले, ज्ञानदेव रांजणे, फिरोज पठाण, डॉ.ज्ञानेश्वर मोरे, जावली बाजार समिती सदस्य शिवाजी गोरे, राष्ट्रवादी आय टी सेल अध्यक्ष सागर धनावडे आदी उपस्थित होते.

बामणोली  आरोग्य केंद्राला १०२ रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध करावी. तसेच आपटी आरोग्य उपकेंद्र लवकरात लवकर सुरू करून या भागातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावावा, अशा सूचना आ शिवेंद्रसिंहराजे यांनी केल्या. आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात बामणोली आरोग्य केंद्राचा कारभार चांगल्या प्रकारे चालू असून रुग्णांच्या सोयीसाठी १०२ रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यावर  डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी कायमस्वरूपी रुग्णवाहिका मिळेपर्यंत भाडेतत्वावर रुग्णवाहिका लवकरच उपलब्ध करून देऊ, असे सांगितले.

सोबतच आपटी उपकेंद्राबाबत केलेल्या सूचना बाबत देखील सकारात्मक निर्णय घेत आपटी आरोग्य उपकेंद्र आठवड्यातून एक दिवस सुरू करण्याचे बैठकीत ठरले. त्याप्रमाणे मंगळवार पासून आठवड्यातून एक दिवस आपटी उपकेंद्र सुरू राहणार आहे. तसेच जावली तालुक्यातील सर्वच आरोग्य केंद्रामध्ये रिक्त असणारी पदे लवकरात लवकर भरण्याची सूचना  आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली असून याबाबत त्वरित कार्यवाही करू, असे डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी यावेळी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!